Daund : दौंड शहरातील खड्ड्यांमध्ये अवतरले शेतातील बुजगावणे, शहरात असणाऱ्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रोज अनेक अपघात होत आहेत. कधी रस्त्यांच्या कामासाठी तर कधी विविध कंपन्यांच्या भुमिगत केबल टाकण्याच्या कामासाठी शहरातील रस्ते खोदले जातात परंतु काम काम पूर्ण झाल्या नंतरही  खोदलेले रस्ते संबंधित ठेकेदारांकडून बुजविले जात नाहीत. 

या सर्व प्रकारचा आणि खड्ड्यांचा अंदाज वाहन चालकांना येत नसल्याने शहरात रोज छोटे मोठे अपघात होत आहेत. अपघातांमध्ये अनेकांना गंभीर इजाही  झालेल्या आहेत. अशा खड्ड्यांमुळे दौंडकरांच्या जीवाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

असाच एक प्रकार सध्या खूप चर्चेत आहे. शहरातील कुरकुंभ मोरी समोरील रस्ता एका कंपनीने भूमिगत केबल टाकण्यासाठी खोदला आहे. केबल टाकण्याचे काम झाल्यामुळे 3-4 दिवस झाले काम बंद आहे. परंतु केबल टाकून झाल्यानंतर ठेकेदाराने खोदलेला रस्ता काही ठिकाणी उघडाच ठेवला असल्याने रात्रीच्या वेळेस या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने व खड्ड्या भोवती सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजना नसल्याने ते दुचाकीसह खड्ड्यात पडून जखमी होत आहेत. 

ही सर्व परिस्थिती पाहून या परिसरातील झुंज मित्र मंडळाने प्रशासनाचे व ठेकेदाराचे लक्ष वेधण्यासाठी या खड्ड्यामध्ये शेतातील बुजगावणे उभे केले आहे. हे बुजगावणे नागरिकांचे लक्ष वेधुन घेत आहे. झुंज मित्र मंडळाच्या या कामगिरीचे कौतुकही होत आहे. नागरिकांच्या जीवावर उठलेल्या या ठेकेदार विरोधात गुन्हा दाखल करण्याची  मागणी नागरिकांकडून होत आहे.