| सहकारनामा |
दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे असणाऱ्या मोहन जनरल हॉस्पिटल येथे अखेर दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करून तेथील ऑक्सिजनची गरज भागवली आहे.
केडगाव येथील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन संपत आल्याने आणि ऑक्सिजनचा पुरवठा होण्याची चिन्हे दिसत नसल्याने कोविड सेंटर संचालक डॉ.धिरेंद्र मोहन यांनी आपली हतबलता बोलून दाखवली होती. तसेच जर 1 तासांत ऑक्सिजन सिलेंडर आले नाहीत तर अनेक रुग्णांच्या जीविताला धोका असल्याचे त्यांनी सांगितले होते याबाबत सहकारनामा चे वृत्त प्रसिद्ध होताच दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी तेथील सद्य परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित सूत्रे हलवत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले आणि तेथील येणारे संकट दूर केले आहे.
याबाबत दौंडचे तहसीलदार यांनी माहिती देताना दररोज आम्ही प्रत्येक कोविड सेंटरला गरजेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करत असून काही ठिकाणच्या कोविड सेंटरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त रुग्णांची मात्रा वाढल्याने तेथे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे, परंतु तेथेही वेळेवर ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा प्रयत्न असून जसे ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत आहेत तसे ते कोविड सेंटरला पुरवठा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.