दौंड : शहरातील वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने हातगाड्या लावून व्यवसाय करणाऱ्या विरोधात दौंड पोलिसांनी कारवाई केली. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी येथील पदभार स्वीकारल्या नंतर शहरात फेरफटका मारून रस्त्यांवर बेशिस्तपणे हात गाड्या लावून व्यवसाय करणाऱ्यांना, वाहतुकीला अडथळा ठरणार नाही अशा पद्धतीने गाड्या लावून व्यवसाय करा, आपल्यामुळे कोणालाही अडचण होणार नाही याचे भान ठेवा अशी समज दिली होती.
परंतु वारंवार सांगूनही काही ठिकाणचे व्यवसायिकांनी आपल्या हातगाड्या वाहतुकीला अडथळा ठरतील अशाच पद्धतीने लावून आपला व्यवसाय सुरू ठेवला होता अशांवर दौंड पोलिसांनी कारवाई केली. त्याचप्रमाणे आपल्या दुकानाच्या जाहिरातीचे फलक थेट रस्त्यावरच मांडणाऱ्या व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी पुन्हा एकदा समज देऊन त्यांनी रस्त्यावर मांडलेले फलक जप्त केले आहेत. येथील आंबेडकर चौक, शिवाजी चौक, शालिमार चौकातील व्यापाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
शहरातील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. अशाच पद्धतीने वाहतूक करणाऱ्या एका वाहन चालकाकडून पोलिसांनी दंड न घेता त्याच्यावर खटला दाखल केला असता न्यायालयाने त्या वाहन मालकाला तब्बल 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अवैध वाहतूक प्रकरणी आज पर्यंत इतक्या मोठ्या रकमेचा दंड कोणालाच झाला नव्हता असे रिक्षावाले सांगतात. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांनी याचा चांगलाच धसका घेतला आहे.