Daund : निर्दयीपणाचा कळस – पाळीव मांजरांची दगडांवर आपटून निर्दयीपणे हत्त्या करणाऱ्या जमातीचा केडगावमध्ये सुळसुळाट, कठोर कारवाईची मागणी



दौंड : सहकारनामा

मुलांच्या चेहऱ्यावर हमखास स्मित हास्य आणणारा, घरात इकडून तिकडे उड्या मारत धावणारा आणि मुलांसोबत बिनधास्त खेळणारा कोणता पाळीव प्राणी असेल तर तो मांजर आहे असेच उत्तर सर्वजण देतील.



मांजर म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतो गोंडस, रुबाबदार, शांतपणे अंगा खांद्यावर खेळणारा आणि साप, पाली, उंदीर यापासून आपले आणि आपल्या परिवाराचे रक्षण करणारा प्राणी.

मात्र या मायाळू, शांत आणि मानवाच्या परिवारात अबाधित स्थान असलेल्या प्राण्याला जर कुणी निर्दयीपणे दगडांवर आपटून, त्यांची हत्या करून ते पिशवीत टाकून  घेऊन जात असेल असे सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे आणि अनेक लोकांनी आपल्या डोळ्यांनी अनेकवेळा पाहिले आहे.

हा प्रकार घडत आहे दौंड तालुक्यातील केडगावमध्ये. केडगावमध्ये काही लोक आहेत जे लोखंडी पिंजरे घेऊन फिरत असतात. 



या लोखंडी पिंजाऱ्यांमध्ये बोंबील टांगलेले असते. हे पिंजरे हे लोक घरांच्या जवळ, लोकवस्तीच्या जवळ अथवा झुडुपांमध्ये जेथे मांजरी येतील अशा ठिकाणी लावून ठेवतात. बोंबील खाण्यासाठी मांजर आत येताच या पिंजाऱ्यांचे दार बंद होते आणि पाळीव असलेली मांजर या पिंजऱ्यात कैद होऊन जाते.

मांजर पिंजऱ्यात अडकताच हे लोक त्या पाळीव मांजरांना पिंजऱ्यातून बाहेर काढून मोठ्या दगडांवर किंवा दगडांच्या भिंतींवर आपटून त्यांना ठार मारतात आणि ते एका पोत्यामध्ये टाकून खाण्यासाठी घेऊन जात असल्याच्या गंभीर घटना या परिसरात घडत आहेत. 

लोकांनी मोठ्या मायेने पाळलेल्या या मांजरी गुपचूप चोरून, पिंजरे लावून हे लोक पकडतात आणि त्या मालकाला माहीत होईपर्यंत त्या मांजरांना ठार मारून पोबारा करत असल्याचे अनेक ठिकाणी घडत आहे. 

या निर्दयी लोकांवर आता कडक कारवाई करण्याची मागणी लोकांमधून होत असून जर या लोकांवर वेळीच कारवाई झाली नाही तर मांजर पकडणारे लोक आणि मांजरांना पाळणाऱ्या लोकांमध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.