Daund : श्री सत्यनारायण पूजेने तीर्थक्षेत्र श्री.नारायण बेट येथील मंदिर भाविकांसाठी सुरु



दौंड (देऊळगाव गाडा) : सहकारनामा ऑनलाइन (दिनेश कुलकर्णी)

कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनमध्ये  सुमारे ८ महिने बंद असलेली सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सोमवार दि .१६ नोव्हेंबर २०२० रोजी खुली करण्यात आली.

या आदेशाला अनुसरूनच श्री सद्गुरू नारायण महाराज दत्त संस्थान बेट (केडगांव) येथील मंदिरे सर्व भाविकांसाठी सुरु  होणार आहे अशी माहिती संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री. संजय शितोळे व विश्वस्त मंडळ यांनी दिली.

यावेळी शितोळे यांनी बोलताना ‘मला सर्व भाविकांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि, आपण आपली मंदिरे  सोमवार दि. १६ नोव्हेंबर २०२० रोजी सर्व भक्तांसाठी सुरु करत असून यावेळी श्री.महाराजांना प्रिय असलेली श्री सत्यनारायण पूजा संपन्न करून मंदिर पुन्हा दर्शनासाठी उघडत आहोत.

सर्व भाविकांनी लॉकडाऊन काळात गेले ८ महिने विशेष सहकार्य केले त्याबद्दल सर्व भक्तांचे मनापासून आभार मानतो, तसेच यापुढे देखील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन भक्त करतील व  व्यवस्थापनास सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे असे मत व्यक्त केले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भाविकांनी विशेष काळजी घ्यावी, तसेच  संस्थेने शासनाने वेळोवेळी कोरोना काळात लॉकडाऊन मधील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले आहे व यापुढे देखील शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे आम्ही पालन करू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

येणाऱ्या भाविकांच्या माहितीसाठी नियमावली फलक मंदिर परिसरात लावलेले आहेत. यावेळी सर्व भाविकांच्या मनात दर्शनाची ओढ आहे परंतु भाविकांनी दर्शनास येताना मास्क व साॅनिटायजरचा वापर करावा, मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुवावे, कोणत्याही प्रकारची फुले, हार , प्रसाद , श्रीफळ आणू नयेत, मंदिरात अनावश्यक गर्दी टाळावी, मंदिरातील कोणत्याही वस्तुला स्पर्श करू नये असे आवाहन त्यांनी केले.