– सहकारनामा
दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव गायरान जमीन गट नं.118 या जागेेेत रहिवासी घरांजवळ मृतदेहांवर अंत्यविधी करण्यात येत असून यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील केडगाव येथील गायरान जागेमध्ये जमावबंदीला हरताळ फासून अंत्यविधी केले जात आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते भानुदास गायकवाड यांनी दौंड तहसील आणि प्रांत कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. केडगाव येथील गायरान जमीन गट नं 118 या जागेत जेथे तहसीलदारांच्या हस्ते वनीकरण करण्यात आले होते. त्याच जागेमध्ये लोकांच्या रहिवासी घरांजवळ मृतदेह आणून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.
केडगाव येथील गायरान गट नं 118 मध्ये हा प्रकार सुरू असून तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार केडगाव येथील काही गाव पुढाऱ्यांनी या गायरान जागेत अगोदर तहसीलदार साहेबांना सामाजिक वनीकरण करायचे आहे असे सांगून त्यांना बोलावून घेतले. यावेळी या लोकांनी जवळपास पाच ते सहा एकर जागेला तार कंपाउंड करून घेतले यावेळी येथे काही ग्रामपंचायत सदस्यही उपस्थित होते. तहसीलदार साहेब येताच त्यांच्याहस्ते झाडे लावून येथे वनीकरण होत असल्याचे भासवले गेले मात्र, तहसीलदार साहेबांची गाडी तेथून निघताच येथे वेगळीच चर्चा सुरू झाली आणि या जागेत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात झाली.
हे सर्व होत असताना येथे काही भूमिहीन, शेतमजूर अश्या लोकांची लोकवस्ती, घरे असतानाही त्यांच्या घरांजवळ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात झाली. येथे काहीजण लोकांना उकसवून येथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करा, जवळच्या स्मशानभूमीत जाण्याची गरज नाही असे आवाहन करत असतात अशी चर्चाही होत आहे.
याबाबत तक्रारदार भानुदास गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार ज्या गायरान जागेत उघड्यावर मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात तेथून जवळच सर्व केडगावच्या नागरिकांसाठी सुसज्ज अशी पारंपारिक स्मशान भूमी आहे. त्यामुळे एक सुसज्ज आणि लोकवस्तीपासून थोड्या अंतरावर एक स्मशानभूमी असताना पुन्हा काही अंतरावर गायरान जागेत दुसरी स्मशानभूमी तयार करण्याचे नेमके कारण काय?? असा सवालही भानुदास गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
सध्या तर संपूर्ण राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी आदेश आहेत. त्यामुळे अंत्यविधीला 20 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही मात्र तरीही केडगाव येथील या गायरान गट नं 118 मधील जागेत अंत्यविधीला मोठ्या प्रमाणावर जमाव जमवून लोकवस्तीजवळच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण मागे याच ठिकाणी कोरोना सदृश रोगाने मृत्यू ओढवलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते भानुदास गायकवाड यांनी केला असून या ठिकाणी स्मशानभूमी करू नये असा पत्रव्यवहार त्यांनी दौंड तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयात केला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार शेजारीच पारंपारिक स्मशानभूमी असताना पुन्हा गायरान जागेत स्मशानभूमी बांधणे किंवा तेथे भर लोकवस्तीजवळ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे हे उचित नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. केडगाव गावठाण येथे पारंपारिक मोठी सुसज्ज स्मशानभूमी असून या ठिकाणी लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. मात्र हि स्मशान भूमी जवळ असतानाही जवळच असणाऱ्या केडगाव येथील गायरान जमीन गट नं 118 मध्ये मृतदेह आणून तेथे अंत्यसंस्कार केले जात आहेत. जेथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात तेथे लोकवस्ती असून त्यामुळे येथील महिला, लहान मुले व रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून माननीय तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेबांनी येथे मृतदेहांवर करण्यात येत असलेले अंत्यसंस्कार हे जवळच सुसज्ज असणाऱ्या स्मशानभूमीत करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे.