Daund – नुकसान झालेल्या भागाचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश : आमदार राहुल कुल



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यामध्ये झालेले अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली असून त्यानुसार नुकसानग्रस्त भागातील पंचनामे सुरू करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.

संपूर्ण पुणे जिल्हा आणि परिसरामध्ये अतिवृष्टिमुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, नागरीकांच्या घरांचे, मालमत्ता व शेतीचे देखिल मोठे नुक़सान झाले आहे. परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पुढील काही दिवस अतिवृष्टिची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे व सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी आमदार कुल यांनी केले आहे.

नदी पट्ट्यातील खानवटे, ता.दौंड  गावचे चार नागरिक दुर्दैवाने राजेगाव मधून वाहून गेले त्यातील तीन मृतदेह आढळले आहेत तर एकाचा शोध सुरू आहे.या दुर्घटनेबाबत आ.राहुल कुल यांनी दुःख व्यक्त केले असून या धोकादायक परिस्थितीमध्ये नागरीकांनी दक्ष राहुन योग्य ती काळजी घ्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. 

दौंड तालुक्यातील नद्यांच्या विसर्गावर व एकुण स्थानिक परिस्थितीवर ते स्वतः व प्रशासन लक्ष ठेऊन आहे. अतिवृष्टीमुळे घराची पडझड, जनावर हानी, मनुष्यहानी, शेतीची हानी झाली, शेतीपंप वाहून गेले आदी संदर्भात नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.