Daund – दौंड येथील रस्त्याच्या कामातील अडथळे दूर करण्याचे प्रशासनाकडून ‛आश्वासन’, रिपब्लिकन सेनेच्या आंदोलकांनी घेतला हा ‛निर्णय’



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

मनमाड -बेळगाव हा दोन राज्यांना जोडणारा राज्य मार्गाचा रस्ता दौंड शहरातून गेलेला आहे. सदरचा रस्ता शहरातील ओम शांती नगर ते गोल राऊंड परिसरातील काही भागांमध्ये अरुंद करण्यात आला आहे ज्यामुळे या भागात अनेक अपघात होऊन जीवितहानी सुद्धा होत आहे.

या समस्येबाबत राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच संबंधित विभागांना वारंवार तक्रारी करून सुद्धा अशा गंभीर परिस्थितीकडे कोणतेच खाते लक्ष देत नाहीत अशी परिस्थिती झाल्याने दौंड रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आनंद बगाडे व अनिल साळवे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील रहिवाशांनी धरणे आंदोलन व रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेत आंदोलन सुरू केले आणि ते सलग आठवडाभर सुरू होते. 

हे आंदोलन यापुढेही आणखीन तीव्र करण्याचा इशारा आंदोलन कर्त्यांनी प्रशासनाला दिल्याने संबंधित प्रशासन खडबडून जागे झाले आणि राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी बारवकर, नगर पालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर, दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेत येत्या एक महिन्यामध्ये रस्ता रुंदी करण्यासाठी येणाऱ्या सर्व अडचणी सोडवून सदरच्या रस्ता रुंदी रुंदी करणाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तुर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. यावेळी प्रभागाचे नगरसेवक जीवराज पवार, जेष्ठ नगरसेवक बादशहा शेख, नगरसेविका कांता साळवे, वसीम शेख, ॲड. अजित बलदोटा, फिलीप अँथोनी तसेच स्थानिक रहिवासी बहुसंख्येने उपस्थित होते.

या परिसरातील काही भागातील रस्ता कामामध्ये काही खाजगी जागा व बंगले अडथळे ठरत होते ज्यामुळे या ठिकाणचा रस्ता अरुंद होत होता, परंतु या विरोधात आंदोलने होऊ लागल्याने प्रशासनाला जाग आली व आता नेमके काय करायचे म्हणून प्रशासनाने धावपळ सुरू केली आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू करण्या आधीच रस्ता कामामध्ये येणाऱ्या खाजगी जागा व बंगल्यांच्या मालकांशी संपर्क करीत मार्ग काढणे अपेक्षित होते. रस्ता रुंदी करणासाठी लागणाऱ्या खाजगी जागेचा मोबदला शासन धोरणाप्रमाणे त्या मालकांना देणे अपेक्षित होते, परंतु असे काहीच न करता रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले म्हणून रस्ता अरुंद झाला असल्याचा आरोप संबंधितांकडून करण्यात येत आहे.

या रस्त्यासाठी ज्या मालकांच्या खाजगी जागा घ्यावयाच्या आहेत त्यांची प्रशासनाला मदत करण्याची मानसिकता आहे, त्यांना फक्त त्यांच्या जागेचा योग्य मोबदला हवा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. संबंधित मालकांना कामा आधीच त्यांच्या जागेचा मोबदला दिला गेला असता तर हा वादच उद्भवला नसता. प्रशासनाने याच रस्त्याबाबत चुकीचे धोरण का अवलंबिले असा प्रश्न विचारला जात आहे.

ज्या खाजगी जागांमुळे रस्ता अरुंद झाला असा आरोप होत असताना त्या खाजगी जागा, बंगले या रस्त्याच्या कामामध्ये येतच नाहीत असे दौंड नगर पालिकेकडून सांगण्यात येत असल्याने गोंधळात आणखीनच भर पडत आहे.