दौंड शहरामध्ये सामान्य आजारांच्या रुग्णांना उपचारासाठी खाजगी दवाखान्याकडून नकार! Daund पोलीस ठाण्यात निवेदन



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरातील खाजगी दवाखाने कोरोना व्यतिरिक्त इतर सामान्य आजारांच्या रुग्णांनाही आपल्या दवाखान्यात उपचारासाठी प्रवेश नाकारत आहेत, उपचारासही नकार देत आहेत असा आरोप करीत , अशा सामान्य आजार असलेल्या रुग्णांची तपासणी करण्याचे व त्यांना दवाखान्यात प्रवेश देण्याबाबतचे आदेश प्रशासनाने शहरातील खाजगी दवाखान्यांच्या प्रमुखांना द्यावेत अशी मागणी रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय दलित पॅंथर, चर्मकार समाज तसेच जय मल्हार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. 

मागणीचे निवेदन तहसीलदार व दौंड पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, शहरातील भीम नगर, सिद्धार्थ नगर, अण्णाभाऊ साठे नगर, जगदाळे वस्ती, घंटा चाळ, शालिमार चौक या परिसरात व  शहरातील इतर ठिकाणी अनुसूचित जाती,जमातीचे नागरिक वास्तव्यास आहेत. पावसाळी वातावरणामुळे येथील नागरिक सर्दी, ताप, खोकला आजाराने ग्रस्त आहेत, अशा रुग्णांना शहरातील खाजगी दवाखाने प्रवेश नाकारत आहेत. गोरगरीब रुग्णांना उपचार देणारे उपजिल्हा  रुग्णालय शहरापासून खूप लांब असल्याने त्या ठिकाणी जाणे येणे रुग्णांना कठीण झालेले आहे. अशा रुग्णांसाठी प्रशासनाने रुग्णवाहिकेची सोय करावी किंवा शहरातील जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुन्हा रुग्णालय सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे, तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी शहरातील पिरॅमिड, योगेश्वरी व महालक्ष्मी हे तीन दवाखाने प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यांना कोरोना बाधितांचे उपचार करण्याचे आदेश दिलेले आहेत. पिरॅमिड व योगेश्वरी दवाखान्यामध्ये  बाधितांना उपचार दिले जात आहे. पक्षाचे पदाधिकारी आनंद बगाडे,अनिल साळवे, मोहन सोनवणे,विशाल माशाळकर,राजू गायकवाड, प्रकाश सोनवणे,अमोल कांबळे, निलेश जगताप,अजय डेंगळे,अनिल सोनवणे, विश्वजीत सलगर आदी यावेळी उपस्थित होते