दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या एका हॉटेल समोरून तीन चोरट्यांनी दुचाकी चोरली, दुचाकी मालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दुचाकी चोरीचे स्टेट्स आपल्या मोबाईलवर ठेवले. त्यांनतर दुचाकी चोरून घेऊन जाणाऱ्या चोरट्यांचा सुगावा लागला. त्यावेळी स्थानिक युवक आणि केडगाव पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला नंतर मात्र यातील एका चोरट्याला अखेर चोरी केलेल्या दुचाकीसह जेरबंद करण्यात यश आले आहे.
याबाबत शशिकांत दादा मोरे (वय ३२ वर्षे व्यवसाय मजुरी रा बोरीपार्थी ता. दौंड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि.०७/०८/२०२३ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास ते केडगाव हद्दीत असणाऱ्या जयश्री हॉटेलमध्ये जेवण पार्सल आणण्याकरीता त्यांच्याकडील हिरो होंडा कंपनीची सुपर स्पेल्डंर मोटार सायकल नंबर एम. एच १४ ए. एक्स ६८०२ यावर गेले होते. ज्यावेळी ते जेवण पार्सल घेवुन हॉटेल बाहेर आले त्यावेळी त्यांची वरील वर्णनाची दुचाकी हॉटेल समोर दिसली नाही. त्यामुळे त्यांनी दत्ता सोपान हंडाळ, निलेश मल्हारी हंडाळ, दिनेश सोपान हंडाळ यांच्या सहाय्याने परिसरात मोटार सायकलचा शोध सुरू केला आणि मोटार सायकल चोरीला गेल्याचे स्टेटस मोबाईलवर ठेवले.
त्यांनतर हे सर्वजण मोटार सायकलचा शोध घेत असताना दत्ता सोपान हंडाळ यांना पारगाव येथील विशाल सतिश घिगे यांनी फोन करून सांगितले की, तुमची मोटार सायकल ही तीन अनोळखी इसमांनी पारगाव बाजुकडे घेवुन जात असताना मी पाहिले आहे. त्यांनतर फिर्यादी यांनी लागलीच केडगाव पोलीस चौकीचे पो.ना. विकास कापरे यांना सदर घडल्या प्रकाराबाबत कळविले. यावेळी सहा फौजदार बाळासो गाडेकर व पो. ना. विकास कापरे, भारत भोसले हे घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी फिर्यादी तसेच दत्ता सोपान हंडाळ, निलेश मल्हारी हंडाळ, दिनेश सोपान हंडाळ असे सर्वजण पारगाव बाजुकडे जात असताना रात्री ९:१५ च्या चे सुमारास पारगाव च्या अलीकडील मोसे बुद्रुक येथे त्या इसमाला मोटार सायकलसह सहा फौजदार गाडेकर व
पो.ना कापरे व संबंधित लोकांचे मदतीने पकडण्यात आले.
सहा फौजदार गाडेकर यांनी त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव
दिपक किशोर चौधरी (वय ३२ वर्षे रा. मांगरेवाडी कात्रज पुणे ४३) असे सांगितले व त्याच्या सोबत असलेल्या व पळून गेलेल्या दोन इसमांची नावे १ ) मोहन लक्ष्मण राठोड २) दिपक लक्ष्मण राठोड (दोन्ही रा मांगरेवाडी कात्रज पुणे ४३) असे असल्याचे सांगितले. यावेळी मोटार सायकल चोरास मोटार सायकलसह पोलीसांच्या मदतीने केडगाव पोलीस दुरक्षेत्र येथे आणण्यात आले असून यातील मोटारसायकल चोर आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.