अख्तर काझी
दौंड : शहरातील बाजारपेठेत दुकानांसमोर लावल्या जाणाऱ्या वाहनांवर दौंड पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे, त्यामुळे शहरातील वाहन पार्किंगचा विषय ऐरणीवर आला आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी किंवा अन्य कामासाठी येणाऱ्या लोकांनी आपली वाहने लावायची तरी कोठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण खूप आधीच पूर्ण झालेले असल्यामुळे रस्त्याच्या कडेला पार्किंग व्यवस्था होऊ शकते मात्र त्यासाठी नगरपालिकेने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे असा व्यापाऱ्यांचा सूर आहे. शहरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूला नगरपालिकेने पार्किंग साठी जागा निश्चित करावी व त्यासाठी आवश्यक असणारे रंगाचे पट्टे( निशाणी) मारावेत व अशा आखलेल्या पट्ट्यांच्या बाहेर लावल्या जाणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी जरूर कारवाई करावी अशी मागणी दौंडकर नागरिक व व्यापारी वर्गाकडून होत आहे.
मागील काही दिवसापासून दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव पोलीस स्टेशन परिसरात असणाऱ्या दुकानांसमोर तसेच हॉटेल समोर लावलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. ज्यामुळे नागरिकांना नगरपालिकेकडून न मिळणाऱ्या सुविधांमुळे नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शहरातील पार्किंगचा विषय नगरपालिकेने आता तरी मार्गी लावावा अशी मागणी होत आहे. पोलिसांच्या अचानकच्या या कारवाईमुळे पोलीस व सामान्य नागरिकांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. मागील कित्येक वर्षापासून शहरातील पार्किंगचा विषय मार्गी लावला जावा म्हणून नगरपालिकेकडे सातत्याने मागणी होत आहे मात्र नगरपालिकेने हा विषय कधीच गांभीर्याने न घेतल्याने सामान्य नागरिकांना त्रासाला व पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. दौंड पोलीस स्टेशन समोरील दहा गुंठे जागा नगरपालिकेने विकत घेतलेली आहे तूर्तास सदरची जागा साफ करून त्या ठिकाणी पार्किंग उपलब्ध करून द्यावे अशा सूचनाही नागरिकांकडून येत आहेत.
या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली असता जाधव म्हणाले की, दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी शहरातील पार्किंग बाबत चर्चा झालेली आहे लवकरच पार्किंगचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. शहरातील वर्दळीच्या परिसरामध्ये गस्त घालीत असताना जर रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरतील अशा प्रकारे वाहने रस्त्यांवर दिसली तर आधी अशी वाहने काढावीत म्हणून आवाहन केले जाईल व मगच कारवाई केली जाईल असेही जाधव म्हणाले.
शहरातून चोरीला गेलेल्या अनेक वाहनांचा अद्याप तपास लागलेला नाही. त्यामुळे प्रत्येक वाहन मालक आपले वाहन चोरीला जाऊ नये या भीतीने ,ज्या दुकानात खरेदीला जातो त्या दुकानासमोरच आपले वाहन पार्क करतो आहे. त्यामुळे बाजारपेठेतील दुकानांसमोर रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावली जात आहेत. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर त्यामुळे वाहतूक कोंडी होताना दिसते. नगरपालिका, पोलीस प्रशासनाने शहरात सम- विषम पार्किंगचा प्रयोग राबविणे आवश्यक झालेले आहे असे वाटते.