अख्तर काझी
दौंड : दौंड शहरातील युवावर्ग भाई होण्याचे स्वप्न बाळगु लागला आहे की काय असे चित्र सध्या शहरातील घडणाऱ्या हाणामारीच्या काही घटनांमुळे वाटू लागले आहे. त्यातच आता पुणे व पिंपरी- चिंचवड या शहरानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोयत्याची एन्ट्री पाहायला मिळत आहे.
दौंड मध्ये शहरातील रस्त्यांवर कोयता मिरवून दहशत निर्माण करणाऱ्या दोघा सराईत गुंडांवर दौंड पोलिसांनी वेळीच कारवाई केली आहे. दि.7 ऑगस्ट रोजी राकेश जगताप व सचिन नलावडे हे दोघे सराईत गुंड शहरातील सिद्धार्थ नगर परिसरातील रस्त्यावर हातात कोयता घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करत होते. ही खबर मिळताच दौंड पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार चौधरी, पो. हवा.पांडुरंग थोरात, पो. क. वाघ व चालक देसाई यांनी घटनास्थळी धाव घेऊन या दोघांना जरबंद केले. दोघांच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलमासह म.पो. का. कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने दोघांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे.
पुणे, पिंपरी, चिंचवड शहरांमध्ये अशा प्रकारे कोयता मिरविणाऱ्या गुंडांना तेथील पोलीस खुलेआम चोप देत त्यांची दहशत असणाऱ्या इलाख्यामध्ये व शहरांमध्ये धिंड काढत आहेत. अशा गुंडांची धिंड काढणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना व पोलीस कर्मचाऱ्यांना तेथील वरिष्ठ पोलीस अधिकारी शाबासकी देत त्यांना रिवॉर्ड देत आहेत. मग दौंड पोलीस अशा सराईत गुंडांची धिंड काढण्यासाठी नेमकी कोणाची वाट पाहत आहेत? असा प्रश्न दौंडकर उपस्थित करीत आहेत. अशा गुंडांची जर शहरातून व येथील व्यापार पेठेतून धिंड काढण्यात आली तर अशा भाईंची पोलिसांनी केलेली अवस्था पाहून भाई बनण्याच्या विचारात असणाऱ्या युवा वर्गामध्ये पोलिसांविषयी भीती निर्माण होऊन ते आपला भाई होण्याचा विचार बदलण्याची शक्यता आहे असेही लोक म्हणू लागले आहेत.
दौंड मध्ये सुशिक्षित बेकार युवकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्यामुळे एखादी हाणामारीची घटना घडली की हे बेरोजगार युवक या हाणामारीच्या घटनेत सामील होत आहेत. व आपले अस्तित्व दाखवीत आहेत. परिणामी सुशिक्षित युवकांवर गंभीर गुन्हे दाखल होण्याच्या संख्येतही वाढ होत आहे. गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर आपले पुढील आयुष्यच उध्वस्त होणार आहे याची जाणीव यांना नाही. त्यामुळे घरातील व शहरातील वडीलधारी मंडळींनी पुढाकार घेऊन अशा गुन्हेगारी जगताकडे वळणाऱ्या युवकांना समुपदेशन करून त्यांना याची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे. तरच शहरातील सध्याचे भयानक चित्र बदलेल असे वाटते.