अख्तर काझी
दौंड : दौंड तालुक्यातील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याची ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी तब्बल 28 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याची घटना समोर आली आहे. बीड व सांगली येथील कंत्राटदार, मुकादमांनी सदर साखर कारखान्याबरोबर ऊस तोडणी वाहतूक व हार्वेस्टर मशीन उपलब्ध करून देण्याचे करार केले परंतु साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतरही त्यांनी कबूल केलेली यंत्रणा उपलब्ध करून न देता दौंड शुगरचे लाखो रुपये लाटले असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी दौंड शुगर कारखान्याच्या शेतकी विभागाचे राहुल सदाशिव आटोळे यांनी फिर्याद असून त्यांच्या फिर्यादीवरून हनुमान भास्कर थोरात (रा.लिंबा गणेश, बीड) हर्षद दिलीप कुशिरे (रा.उरणवाडी,ता. वाळवा, जिल्हा सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 20 सप्टेंबर 2023 ते 21 नोव्हेंबर 2023 दरम्यान ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार मुकादम हनुमान भास्कर थोरात व हर्षद दिलीप कुशिरे यांनी दौंड शुगर कारखान्याच्या 2023-24 गळीत हंगामासाठी कारखान्याबरोबर रीतसर ऊस तोडणी वाहतूक करार केला. यापैकी हनुमान थोरात यास कारखान्याने वाहतूक टोळी व पाच ट्रॅक्टर साठी वेळोवेळी धनादेशाद्वारे 18 लाख 50 हजार रुपये अदा केले. तसेच हर्षद कुशिरे यास हार्वेस्टर मशीन उपलब्ध करून देण्यापोटी 10 लाख रुपये धनादेशाद्वारे दिले. याप्रमाणे आरोपींनी कारखान्याशी साखळी पद्धतीने करार करून 28 लाख 50 हजार रुपये उचल घेतली. कारखान्याचा 2023 -24 चा गळीत हंगाम 3 नोव्हेंबर 2023 रोजी पासून सुरू झाला.
कारखान्याशी केलेल्या कराराप्रमाणे सदर दिवसापासून वरील यंत्रणा ऊस तोडणी वाहतूक कामासाठी हजर राहणे अपेक्षित होते. परंतु संबंधित मुकादमांनी कराराप्रमाणे यंत्रणा कामावर हजर ठेवली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी संबंधित मुकादमांना समक्ष भेटून व फोनवरून यंत्रणा हजर करण्याबाबत सूचना केल्या, तरीसुद्धा या मुकादमांनी यंत्रणा कामावर हजर केली नाही. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्याकडे कारखान्याची रक्कम परत करण्याची मागणी केली परंतु त्यांनी रक्कम परत न करता कारखान्याची फसवणूक केली.