Daund | जीवे मारण्याची धमकी देत विद्यार्थिनीचा विनयभंग, दोघांना अटक

अख्तर काझी

दौंड : प्रेमास नकार देणाऱ्या कॉलेज विद्यार्थिनीच्या घराची तोडफोड करीत, विद्यार्थिनी व मोठ्या बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना दौंड मध्ये घडली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी सोहेल जावेद तांबोळी (रा. खाटीक गल्ली ,दौंड) व त्याचा साथीदार राजेश पवार (रा. रॉयल अपार्टमेंट, बंगला साईट दौंड) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023, कलम 74,115(2),352,351(2),324,(5),3(5) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दि. 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 च्या दरम्यान घडली. फिर्यादी भाजीपाला आणण्यासाठी घराबाहेर आली होती, ती इमारतीच्या पार्किंगमध्ये आली असताना आरोपी सोहेल व साथीदार राजेश तेथे आले. सोहेल याने मुलीला थांबण्यास सांगितले व तू मला आवडते, माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणाला. मुलीने नकार देऊन पुढे निघाली असता, सोहेल याने तिचे दोन्ही हात धरून तिला आपल्याकडे ओढले व मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यावेळी मुलीने आरडाओरडा केल्याने इमारतीमध्ये राहणारा मुलगा व पीडित मुलीची मोठी बहीण धावत तेथे आले.

आरोपी सोहेल त्रास देत असल्याचे तिने बहिणीला सांगितले. बहिणीने याचा जाब आरोपीला विचारला असता त्याने तिलाही शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मदतीला आलेल्या मुलालाही त्याने लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. यावरच न थांबता आरोपी सोहेल व त्याचा साथीदार राजेश याने मुलीच्या घराच्या दरवाजाला लाथा मारून दरवाजा तोडून नुकसान करीत दहशत केली. दरम्यान इमारतीमधील नागरिक जमा होऊ लागल्याने साथीदाराने तेथून पळ काढला. परंतु नंतर पोलिसांनी साथीदार राजेश यालाही ताब्यात घेतले. घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक बापू रोटे हे करीत आहेत.

घटनेनंतर पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी त्या मुलीला आपल्या कार्यालयात बोलावून घेतले, तिचे समुपदेशन केले. चांगले शिक्षण घ्या, अशा प्रसंगा नंतर तुम्ही दक्ष रहा, आरोपीने यानंतर काहीही त्रास दिल्यास आमच्याशी संपर्क साधा आम्ही सदैव तुमच्या मदतीसाठीच आहोत असा सल्लाही पवार यांनी मुलीला दिला.