राहुल अवचर
देऊळगावराजे (दौंड) : 24 जुलै 2025 मागील आठवड्यापासून दौंड येथील उत्पादन शुल्क विभागाकडून वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून गोवा राज्यातून येणाऱ्या अवैधरित्या मद्यसाठ्यावर आणि बनावट देशी विदेशी दारूवर मोठी कारवाई केली आहे. दिनांक 18 ते 19 जुलै 2025 च्या दरम्यान एकूण 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधिकारी प्रदीप झुंजरुक यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 18 रोजी पाटस टोल नाक्याजवळ सायंकाळी 9 च्या सुमारास दोन संशयीत मारुती स्विफ्ट डिझायर गाड्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी या गाड्यांमध्ये गोवा राज्यातील बनावट दारू असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी दोन्ही मारुतीच्या स्विफ्ट गाड्यांमध्ये असलेल्या 43 बॉक्ससह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
यावेळी अटकेतील आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर आरोपी संतोष सुनील मारकड याच्या उरुळी कांचन येथील राहत्या घरामध्ये एक लाख 32 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये गोवा राज्यातील बनावट दारूसह, नकली बुचे, देशी दारू बॉटल सीलिंग मशीन असे विविध साहित्य ताब्यात घेण्यात आले.
आरोपींनी विविध ठिकाणी बनावट दारू विक्रीसाठी दिली असल्याची कबुली दिल्यानंतर दौंड तालुक्यातील नांदूर येथे येथील हॉटेल पैलवान या ठिकाणी सुद्धा गोवा राज्यातील बनावट दारूची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने या ठिकाणी सुद्धा छापा टाकून एका आरोपीला अटक करून 70 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच बबन देवचंद पावणे (राहणार मोई, तालुका खेड) याच्या राहत्या घरातून गोवा राज्यातील दारूचे बॉक्स, साहित्य तसेच गाडी असा एकूण 14 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात येउन आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर चंदनवाडी येथील हॉटेल गावकरी येथे सुद्धा गुन्ह्यातील आरोपींनी दारू विक्रीसाठी दिली आहे त्या ठिकाणी छापा टाकला असता 96 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर हॉटेल मालक आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये संतोष सुनील मारकड (राहणार उरुळी कांचन) वैभव शिवाजी तरंगे (राहणार वेंकटेश नगर) आकाश बाळासाहेब कोडलिंगे (राहणार चंदन नगर) कुणाल सुनील कोल्हे (राहणार नांदूर) बबन देवचंद पावने (रा.मोई, ता.खेड) या आरोपिंचा समावेश असून यातील किरण देवचंद पावणे हा आरोपी फरार आहे. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पुढील तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त, अंमलबजावणी व दक्षता विभाग प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक पुणे अतुल कानडे, उपअधीक्षक उत्तम शिंदे, विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक एम व्ही गाडे, प्रदीप झुंजरुक, डी आर ठाकूर, जवान संकेत वाजे, सहायक दुय्यम निरीक्षक विकास थोरात, जवान शुभम भोईटे, एस आर देवकर, केशव वामने आदी अधिकारी, कर्मचारी यांनी केली आहे.