Categories: क्राईम

दौंड | एसटी कंडक्टरवर प्रवाशाकडून चाकू हल्ला, हल्ल्यात कंडक्टर जखमी तर प्रवाशाचा हात मोडला

अख्तर काझी

दौंड : साताऱ्याहून बारामती मार्गे पैठणला निघालेल्या सातारा -पैठण एसटीच्या कंडक्टरवर (वाहक) प्रवाशाने चाकू हल्ला करून मारहाण केल्याची घटना दौंड मध्ये घडली आहे. या प्रकरणी एसटी वाहक दत्ता संतराम कुटे (रा. कुटेवाडी,बोरफडी) यांनी फिर्याद दिली आहे. हरून इकबाल कुरेशी (रा. कुरेशी गल्ली, बारामती) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रवाशाचे नाव असून या प्रकरणात आरोपी हरून कुरेशी याचाही हात मोडला असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.22 जुलै रोजी 10.45 वाजण्याच्या दरम्यान एसटी दौंड येथील गोल राऊंड येथून नगरमोरी चौकात जात असताना सदरची घटना घडली. फिर्यादी पैठण डेपोमध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत. बारामतीहून निघालेली सातारा -पैठण गाडी दौंड मार्गे जात असताना, कुरकुंभ घाटाच्या खाली एक एसटी बंद पडलेली (ब्रेक डाऊन) दिसल्याने चालकाने गाडी थांबविली व त्या बंद पडलेल्या एसटी मधील प्रवासी आपल्या एसटीमध्ये घेतले.

त्या प्रवाशांना दौंड शहरातील गोल राऊंड येथील थांब्यावर उतरविले. प्रवासी उतरल्यानंतर एसटी पुढे जात असताना कंडक्टर यांनी प्रवासी मोजले असता एसटीमध्ये एक प्रवासी जास्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. म्हणून त्यांनी प्रवाशांची तिकिटे तपासली तेव्हा प्रवासी हरून कुरेशी याच्याकडे गोल राऊंड पर्यंतचेच तिकीट असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे फिर्यादी यांनी कुरेशी याला तुमचा स्टॉप तर मागेच गेल्याचे सांगितले. यावेळी कुरेशी म्हणाला की मला पुढे नगरमोरी येथे उतरावयाचे आहे. म्हणून फिर्यादी यांनी त्याला पुढचे तिकीट घ्यावे लागेल असे म्हणाले असता त्याने त्यांच्याशी वाद घालावयास सुरुवात केली व शिवीगाळ करीत मारहाण केली.

यावेळी कुरेशीने त्याच्याकडील असणाऱ्या चाकूने फिर्यादी यांच्यावर वार केले. एक वार त्यांच्या ओठावर लागला व त्यात ते जखमी झाले. फिर्यादी व मध्यस्थी करणाऱ्या प्रवाशांनाही त्याने चाकूचा धाक दाखवीत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यामुळे चालकाने एसटी थेट दौंड पोलीस स्टेशनला आणली. फिर्यादी ,चालक व काही प्रवाशांनी त्याला पोलीस स्टेशन कडे घेऊन जात असताना तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पळून जात असताना तो चिखलामध्ये घसरून खाली पडला. त्याला पकडून पोलीस स्टेशनला आणण्यात आले.

यावेळी पडल्यामुळे त्याचा हात मोडला आहे व तो दुखत आहे असे तो सांगत होता. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव हरून कुरेशी असल्याचे सांगितले. कुरेशी विरोधात, सरकारी कामात अडथळा आणणे व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पो.उपनिरीक्षक अबनावे करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

16 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago