दौंड : बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना घडली. या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. दौंड मध्ये सर्व राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीने या घटनेचा व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा निषेध नोंदविण्यात आला. दौंड पोलिसांना निषेधाचे निवेदन देण्यात आले, सहा.पो. निरीक्षक तुकाराम राठोड यांनी निवेदन स्वीकारले.
संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची बंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. कर्नाटकातील कानडी भाषकांना इशारा देण्यात आला आहे की, शिवप्रेमींच्या नादी लागू नये, शिवाजी महाराज तमाम हिंदुस्तानचे आराध्य दैवत आहे, त्यांच्या स्मारकाची विटंबना शिवप्रेमी कदापि सहन करणार नाही. कर्नाटकातील अनेक बांधव महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने राहतात, अशी कृत्य त्यांना त्रासदायक ठरू शकतात असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
केंद्र सरकार, कर्नाटक व महाराष्ट्र सरकार यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी नंदू जगताप, राजेंद्र खटी, विक्रम पवार, प्रसाद गायकवाड, गणेश काकडे,दादासो नांदखीले, निखिल स्वामी, विकास जगदाळे, श्यामसुंदर सोनोने, किरण लबडे, आबा फराटे, प्रवीण जगदाळे, अनिल कवडे उपस्थित होते.