Daund | रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी ‛सविता भोर’ तर सचिवपदी ‛दीपक सोनवणे’ यांची निवड

अख्तर काझी

दौंड : रोटरी क्लब ऑफ दौंडच्या अध्यक्षपदी सविता भोर तर सचिवपदी दीपक सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. दौंड शहरात पार पडलेल्या पदग्रहण समारंभात रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या प्रांतपाल मंजू फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत सविता भोर यांनी मावळते अध्यक्ष डॅा. राजेश दाते यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली.

दीपक सोनवणे यांनी मावळते सचिव अमिर शेख यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. मंजू फडके यांच्या हस्ते क्लबच्या सन २०२३ - २०२४ साठीच्या कार्यकारिणी सदस्यांना या वेळी पीन प्रदान करण्यात आली. सहायक प्रांतपाल प्रा. हनुमंतराव पाटील, दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॅा. संतोष टेंगले, आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. प्रांतपाल मंजू फडके यांनी दौंड क्लबच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील उपक्रमांचा गौरवपूर्ण उल्लेख करीत क्लबच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल करण्याचे आवाहन केले.

रोटरी इंटरनॅशनल या संस्थेस ११८ वर्षांचा प्रदीर्घ सेवा वारसा असून त्याचे सदस्य म्हणून सेवा प्रकल्प राबविताना नाविन्यपूर्ण संकल्पना आणि तंत्रज्ञान स्वीकारावे, असे त्या म्हणाल्या. क्लबच्या नूतन अध्यक्षा सविता भोर या प्रबोधिनी विद्या प्रतिष्ठाण या संस्थेच्या अध्यक्षा असून त्यांनी क्लब सचिव म्हणून काम पाहिले आहे. नूतन सचिव दीपक सोनवणे हे दौंड तालुका महाविद्यालयात इलेक्ट्रॅानिक्स विभागाचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.