दौंड मधील घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात दौंड पोलिसांना यश, 80 हजाराच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

दौंड : मेरगळवाडी (ता. दौंड) येथे झालेल्या घरफोडीतील आरोपीला दौंड पोलिस स्टेशनच्या गुन्हेशोध पथकाने सापळा रचून अटक केली. अजय प्रकाश राठोड (वय 19, रा. गिरिम, दौंड) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून 80 हजार रू किमतीचे सहा मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत.
दौंड पोलिसांच्या माहिती नुसार, मेरगळवाडीतील भागवत वस्ती येथे राहणाऱ्या बाळेंदर रामउजागर बर्मा यांच्या घरी दि.18 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान घरफोडी झाली होती. त्यामध्ये त्यांचा मोबाईल संच चोरीला गेला होता. या घरफोडीचा तपास पो. निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस करीत होते. गुन्हे शोध पथकाचे सहा.पो. निरीक्षक तुकाराम राठोड हे पोलीस कर्मचारी सुभाष राऊत, पांडुरंग थोरात आदेश राऊत, अभिजीत गिरमे, सागर गायकवाड, अमोल देवकाते, अमोल गवळी या पथकासह शहरामध्ये गस्त करीत असताना गुप्त माहिती दाराकडून खबर मिळाली की सदरच्या घरफोडीतील संशयित आरोपी येथील बोरावके नगर परिसरामध्ये येणार आहे, पथकाने या ठिकाणी सापळा रचला व संशयित अजय राठोड त्या ठिकाणी येताच त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सहा मोबाईल संच मिळून आले, पोलिसांनी ते ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.