दौंड : दौंड मधील किराणा मालाचे होलसेल व्यापारी भख्तु सुखेजा यांच्या हातातील पैशाची बॅग चोरट्यांनी लांबविली असल्याची घटना घडली.दि.6 डिसेंबर रोजी रात्री 9.45 वा. दरम्यान शहरातील दौंड – सिद्धटेक रोडवरील भर वस्तीतील संभाजी चौकात( गोवा गल्ली) व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडल्याने व्यापार पेठेत खळबळ उडाली.
चोरट्यांनी सुखेजा यांच्या लंपास केलेल्या बॅगेमध्ये तब्बल 19 लाख 64 हजार रू असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भख्तु मेवदमल सुखेजा(वय 65,रा. फराटे गल्ली,दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. दौंड पोलिसांनी 5 अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी दि.6 डिसेंबर रोजी रात्री 9.45 वा. दरम्यान आपले दुकान बंद करून, दुकानातील दिवसभरातील माल विक्रीची रक्कम(1 लाख 64 हजार) असलेली बॅग घेऊन दुकानापासून जवळच असलेल्या आपल्या घरी पायीच निघाले होते, फिर्यादी संभाजी स्तंभ चौकात आले असता पाठीमागून अचानक पणे आलेल्या 5 जणांनी त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावली. व चोरट्यांपैकी एकाने बॅग हिसकावताना त्याच्याकडील असलेली मिरची पुड फिर्यादी यांच्या अंगावर उधळली, चोरट्यांनी पैशाची बॅग घेऊन गोवागल्लीतून तुकाई नगर कडे जाणाऱ्या रस्त्याने पळ काढला.
दरम्यान दौंड पोलिसांना घटनेची खबर देण्यात आली, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेची संपूर्ण माहिती घेतली. संपूर्ण रात्र पोलिसांनी शहरासह, रेल्वे स्टेशन,नवीन कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशन ,नगर मोरी, जगदाळे वस्ती, खोरवडी, आलेगाव, लिंगाळी परिसर पिंजून काढला. या सर्व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. गोवा गल्लीतील भंगार मालाचे दुकान व सिंधी मंगल कार्यालया समोरील प्रकाश वाईन्स या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे पाचही चोरटे कैद झाले आहेत त्या दिशेने दौंड पोलीस तपास करीत आहेत.