अख्तर काझी
दौंड : कोरोना काळानंतर दौंड – पुणे – दौंड या मार्गावरील रेल्वेच्या फेऱ्या अद्याप सुरू केलेल्या नाहीत, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या स्लीपर क्लास बोगीमध्ये कपात करण्यात आली आहे. तसेच ज्या सुपर फास्ट गाड्या दौंड जंक्शन स्थानकात थांबत नाहीत त्यांना थांबा द्यावा म्हणून गेली दोन वर्षे प्रवासी संघटना शांततेच्या मार्गाने बैठका घेऊन, निवेदन देऊन रेल्वे प्रशासनास या समस्यांबाबत वेळोवेळी स्मरण देऊन सुद्धा रेल्वे प्रशासन अजून पर्यंत काहीच दखल घेत नाही त्यामुळे आज दि.16 रोजी प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे विभागीय व्यवस्थापक श्रीमती इंदूराणी दुबे यांची भेट घेऊन प्रवाशांच्या मागण्या आणि समस्या पुन्हा एकदा त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक संजय हिरवे यांच्याशी देखील स्वतंत्र पणे सविस्तर चर्चा केली, त्याच प्रमाणे वरिष्ठ यातयात निरीक्षक डॉ. स्वप्नील नीला यांच्या बरोबर डेमु आणि मेमु वेळेत स्थानकात घ्याव्यात आणि स्थानकातून वेळेत सोडण्यात याव्यात,आदी विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिले. गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यासाठी पर्याप्त रेक उपलब्ध नाहीत आणि दौंड हे पुण्याचे उपनगर कागदोपत्री नाही म्हणून मेमु लोकल दौंड - पुणे धावण्यास अडथळा निर्माण झाला आहे, दौंड सबर्बन करण्यासाठी प्रशासन पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे पुणे विभागीय व्यवस्थापक श्रीमती इंदुराणी दुबे यांनी सांगितले.
तसेच दौंड - पुणे तिसऱ्या व चौथ्या ट्रॅक साठी देखील आम्ही पाठपुरावा सातत्याने करत आहोत
. पण यासाठी प्रत्यक्ष किती कालावधी लागेल या बाबत आत्ताच काही सांगता येणार नसल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
सदर काम अति जलद करून घेण्यासाठी खासदार व आमदार यांच्या मार्फत रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे प्रयत्न केल्यास प्रश्न लवकर मार्गी लागेल असे त्यांनी सांगितले.
सदर बैठकीस प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष गणेश शिंदे, दत्ता बरकडे,राहुल तोटे, सूहेब तांबोळी,साजिद खान, रवी चेटीयर, बापू हरदास, क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य विकास देशपांडे बैठकीस उपस्थित होते अशी माहिती दौंड पुणे प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी दिली.