|सहकारनामा|
दौंड : पुणे,दौंड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या खूपच कमी झाल्याने परिस्थिती आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे खाजगी सेवेतील कर्मचाऱ्यांना आता दौंड -पुणे- लोणावळा रेल्वे प्रवासा करिता अनुमति मिळावी अशी मागणी प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी प्रशासनाकडे केली आहे.
दौंड -पुणे प्रवासी संघाचे पदाधिकारी गणेश शिंदे व आयुब तांबोळी यांनी संघाच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांकडे दिले आहे. मार्च 2020 पासून सर्वत्रच कोरोना महामारी चा प्रादुर्भाव वाढत होता, कोरोना रुग्णांची संख्या सर्वत्रच वाढू लागल्याने मार्च 2020 पासून रेल्वे प्रशासनाने खाजगी सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासास बंदी केली, ज्यामुळे मागील दीड वर्षापासून अनेक खाजगी क्षेत्रातील कर्मचारी कामावर जाऊ शकले नाहीत परिणामी काहींना नोकरीस मुकावे लागले आहे.
सध्या परिस्थिती आटोक्यात येत असल्याने या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करण्यास अनुमति देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.