दौंड : मराठा आरक्षणासाठी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिल्यानंतर मराठा आरक्षण उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. या दौऱ्याला 15 नोव्हेंबर पासून सुरूवात होत असून गुरूवार दि.16 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ‘वरवंड’ येथील बाजार मैदानावर त्यांची जाहीर सभा होत आहे.
सभेमुळे गुरुवारचा आठवडे बाजार रद्द, शनिवारी भरणार आठवडे बाजार गुरुवारी वरवंड येथील आठवडे बाजार असतो. मात्र मनोज जरांगे पाटील यांची त्याच दिवशी बाजार मैदानावर सभा होत असल्याने येथील आठवडे बाजार रद्द करण्यात आला आहे. याबाबत वरवंड ग्रामपंचायतने पत्र काढले असून त्यामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. सभेमुळे गुरुवारचा आठवडे बाजार पुढे ढकलण्यात आला असून तो आता शनिवारी होणार आहे.
15 पासून राज्यभर दौरा सुरु आणि 16 ला दौंडच्या वरवंडला सभा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणातून निर्णायक लढा ऊभारणारे मनोज जरांगे-पाटील यांची दौंड तालुक्यातील वरवंड येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला आता 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत त्यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले आहे. मात्र ते 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर असा राज्यभर दौरा करणार असून या दौऱ्यात ते शक्य तितक्या जास्तीत जास्त गावांना भेट देऊन सभा घेऊन मराठा समाजात आरक्षणाबाबत जनजागृती करत आहेत. दौंड तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने वरवंड येथील सभेचे नियोजन करण्यात आले आहे.