दौंड : दौंड तालुक्यात विधानसभा निवडणुक प्रचाराने अती हीन पातळी गाठल्याचे दिसत आहे. ज्याला जो शब्द सापडेल तो त्या शब्दांत विद्यमान आमदारांवर तोंड सुख घेताना दिसत आहे. त्यामुळे विरोधकांकडे संस्कार नावाची काही गोष्ट राहिली आहे कि नाही असा प्रश्न तालुक्यातील सर्वसामान्य जनता विचारू लागली आहे. या सर्वांमध्ये आता ‘गद्दार’ या आणखी एका नावाची भर पडली आहे. काल एक मोठे नेते तालुक्यात येऊन गेले अण गद्दाराला पाडा, याने गद्दारी केली आहे, हा माझ्यामुळे निवडून आला आहे असे अनेक आरोप करून निघून गेले. मग काय अनेक टिकोजीरावांनी त्यांचे हे शब्द झेलत ते तालुकाभर मीठ मसाला लावून कसे पसरवता येतील याची पुरेपूर काळजी घेतली.
मात्र या सर्व घडामोडीवर आता सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या असून, तुम्ही ज्यांना गद्दार म्हणताय ना त्या गद्दाराने कोरोना काळात आपलं संपूर्ण कुटुंब जनतेच्या सेवेसाठी बाहेर काढलं होतं, एकवेळ तर अशी आली कि हे संपूर्ण कुटुंब कोरोना बाधित झालं मात्र या गद्दाराने जनतेत जाणं आणि जनतेची सेवा करणं थांबवलं नाही. आरोग्यनिधीच्या माध्यमातून या गद्दाराने तालुका नव्हे तर आसपासच्या अनेक जिल्ह्यातील रुग्णांना मदत केली हे गद्दारीच मोठं लक्षण म्हणावं का..? ज्यावेळी तालुक्याला प्रांत कार्यालय मिळण्याची आशा निर्माण झाली होती त्यावेळी हे प्रांत कार्यालय पुण्याला घेऊन जा अथवा पुरंदरला ठेवा असा आग्रह कुणी केला होता..? आणि प्रांत कार्यालय दौंड तालुक्यातच व्हायला पाहिजे यासाठी याच गद्दाराने तब्बल दहा वर्षे लढा दिला अण अखेर प्रांत कार्यालय दौंड तालुक्यात झालेच.
तालुक्याच्या आजू बाजूचे बंद झालेले सहकारी कारखाने पुन्हा सुरु झालेच नाहीत. मात्र ज्यावेळी बँकांनी भीमा पाटस कारखाना जप्त करून लिलाव करण्याची तयारी सुरु केली त्यावेळी याच गद्दाराने दिल्लीपर्यंत जाऊन हा कारखाना वाचविण्यासाठी जीवाचे रान केले, कारखाना विकू न देता तो चालू केला आणि ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांच्या उसाला चांगला भाव दिला. शेकडो कामगारांना चुली पुन्हा पेटवल्या आणि हा कारखाना सभासदांच्या मालकीचाच ठेवला ही जर गद्दारी असेल तर ही व्यक्ती गद्दारच आहे. याच गद्दाराने दिल्लीपर्यंत पाठपुरावा करून जी न्यायालये फक्त बारामतीत होती ती सिनिअर न्यायालये दौंडला आणली, याच गद्दाराने तालुक्यातील रस्ते शासनाच्या स्कीममध्ये योग्यरित्या बसवून सर्व तालुक्यात अष्टविनायक, शिरूर सातारा महामार्ग, गावोगावी सिमेंट काँकरीट रस्त्यांचे जाळे विनले.
याच गद्दाराने बेबी कॅनॉल, खडवासलाचे अतिरिक्त पाणी तालुक्याला मिळण्यासाठी मोठा लढा दिला आणि त्यातून शेतकरी बांधवांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. याच गद्दाराने मुळशीचे पाणी तालुक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला अण शासनालाही त्यांच्या मागणीची दाखल घेऊन या प्रस्तावावर विचार करावा लागला आणि अखेर त्या पाठपुराव्याला मोठे यशही आले. त्यामुळे तालुक्यात नुसती पदे मिळवण्यासाठी कोण धडपडतंय आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी कोण अहोरात्र झटतंय हा फरक नागरिकांना नक्कीच समजत आहे.
आज या ना त्या प्रकारे या माणसाला खाली ओढण्याचा, कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक आस्तिन चे साप या माणसाला ढसू पाहत आहेत. तालुक्यात जातीवादाचे बीज पेरू पाहणारे काही गद्दार हे काही संघटनांच्या स्टेजवर उभे राहून थेट दोन जाती, धर्मांमध्ये वाद लावू पाहत आहेत मात्र हाच माणूस ज्याला गद्दार म्हणून हिणवलं जातं तो सर्व जाती धर्मांच्या लोकांमध्ये समेट घडवून आणत भयंकर प्रकार येथे होऊ देत नाही. या गद्दाराला २०१४ सालच्या निवडणुक प्रचारात मंत्रिपदाचा शब्द कुणी दिला होता आणि मंत्रिपद देण्याची वेळ आली त्यावेळी या गद्दारासोबत नेमकी कशी गद्दारी झाली हेही समोर येणं गरजेच आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडीअडचणींना उभं राहणं ही गद्दारी असले तर नक्कीच ही व्यक्ती गद्दार आहे.
शेजारील बारामती तालुका सुजलाम सुफलाम होतोय मग माझा तालुका मागे का असा प्रश्न विचारून तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी यासाठी कष्ट घेऊन मोठमोठ्या योजना तालुक्यात राबवणे ही गद्दारी असेल तर नक्कीच ही व्यक्ती गद्दार आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना आरोग्यनिधीतून मोठ्या प्रमाणावर मदत करणे ही जर गद्दारी असेल तर ही व्यक्ती गद्दारच आहे. चांगल्या कामासाठी युवकांना एकत्र आणून त्यांची एक मोठी ताकद उभी करणं आणि त्यांच्या रोजगारासाठी मोठमोठे कॅम्प घेणं ही जर गद्दारी असेल तर नक्कीच ही व्यक्ती गद्दार आहे. आणि या व्यक्तीच्या कार्यकडे पाहून जर तालुक्यातील जनता या व्यक्तीला सलगपने निवडून देत असेल तर तुम्ही जनतेला सुद्धा गद्दार म्हणणार का असा प्रश्न आता तालुक्यातील नागरिक उपस्थित करू लागले आहेत.