अख्तर काझी
दौंड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यातील सध्याच्या राजकीय उलथापालथीच्या वातावरणा विरोधात संपूर्ण राज्यामध्ये ‛एक सही संतापाची’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याच धर्तीवर दौंड शहरातही पक्षाच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक सही संतापाची कार्यक्रम राबविण्यात आला.
सध्या राज्यातील राजकारणाचा जो चिखल झाला आहे या न बघविणाऱ्या परिस्थिती विरोधात सामान्य जनतेमध्ये संतापाची लाट आहे असे पहावयास मिळत आहे, त्यामुळे सामान्यांच्या भावना त्यांना व्यक्त करता याव्यात म्हणून पक्षाच्या वतीने सदरचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे असे मनसेचे पदाधिकारी सचिन कुलथे यांनी यावेळी सांगितले. पक्षाचे पदाधिकारी संदीप बोराडे, मंगेश साठे, नंदकिशोर मंत्री, लता बगाडे, अभिजीत गुधाटे, अक्षय साठे तसेच शिवसेना ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष आनंद पळसे व अजय कटारे उपस्थित होते.
एक सही संतापाची हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी विरोधात आहे की ज्यांनी स्वतःचा पक्ष फोडून भाजपाला साथ दिली आहे त्यांच्या विरोधात आहे असा प्रश्न कुलथे यांना विचारला असता ते म्हणाले की, या तिन्ही पक्षांच्या विरोधात हा संतापाचा कार्यक्रम आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे व राज ठाकरे या बंधूंनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे व त्याची आवश्यकता ही आहे असेही कुलथे म्हणाले. ठाकरे बंधू आता तरी एकत्र या असा मजकूर लिहून काही शिवसैनिकांनी सह्या केल्या.