Political
दौंड तालुक्यात झालेल्या 8 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपला 5 जागेंवर यश आले असून राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निकालामुळे भाजपचा आनंद गगनात मावेनासा झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दौंड तालुक्यातील राहू बेट म्हणून परिचित असलेल्या नांदूर, देवकरवाडी आणि पाटेठाण येथे अगोदर राष्ट्रवादीची सत्ता होती मात्र आज लागलेल्या निकालात या तिन्ही ठिकाणी भाजपची सरशी झाल्याचे पहायला मिळाले आहे.
आठ ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायती ह्या भाजपकडे आल्या असून यात फक्त दापोडी ही एक ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे तर डाळिंब या ठिकाणी भाजप, राष्ट्रवादीला धूळ चारत अपक्ष उमेदवार सरपंचपदी विराजमान झाले. तर पाटेठाण येथे सरपंच पदाच्या उमेदवारांचे फॉर्म बाद झाले मात्र येथेही भाजप आमदार राहुल कूल यांच्या ग्रामपंचायत सदस्य उमेदवारांनी बाजी मारली आहे. वरील निकालामुळे राष्ट्रवादी माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटाला आत्मचिंतनाची गरज निर्माण झाली असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना भाजप कश्या प्रकारे आव्हान उभे करणार आहे हे आज त्यांनी निकालातून दाखवून दिले आहे.
राहू बेट परीसरात जरी भाजप आमदार राहुल कूल यांचे वर्चस्व असले तरी मागील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी मोठे यश आल्याचे पहायला मिळाले होते. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला अंतर्गत कुरखोडी नडल्याचे त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून बोलले जात असून त्यामुळे यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसला जर यश हवे असेल तर त्यांना आपल्या व्युहरचनेत मोठा बदल करावा लागणार आहे. भाजप ची सरशी झाल्याने त्यांचा आनंद हा गगणात मावेनासा झाला असून त्यांच्या राजकीय व्युहरचनेच्या जाळ्यात चांगले चांगले मासे गारद झाल्याचे पहायला मिळत आहे.
भाजप आमदार राहुल कुल समर्थक सरपंचपदाचे विजयी उमेदवार व त्यांची मते –
देवकरवाडी – तृप्ती दिगंबर मगर (861)
दहिटणे – आरती सचिन गायकवाड (716)
नांदूर -युवराज बबन बोराटे (765)
बोरिभडक -कविता बापू कोळपे (1015)
लोणारवाडी – प्रतीक्षा निलेश हिवरकर (560)
राष्ट्रवादी माजी आमदार रमेश थोरात समर्थक विजयी उमेदवार व त्यांची मते –
दापोडी – आबासो तुकाराम गुळमे (1008)
तर डाळिंब येथे अपक्ष उमेदवार बजरंग सुदाम म्हस्के यांनी (933) मते मिळवत कुल व थोरात समर्थक उमेदवारांचा पराभव केला आहे. पाटेठाण येथील सरपंच पद हे रिक्त असून सदस्यपदामध्ये कुल समर्थकांनी बाजी मारली आहे.