|सहकारनामा|
दौंड : नागरिक हीत संरक्षण मंडळाने (कटारिया गट) दि.6 सप्टेंबर रोजी गटाच्या नगरसेवकांची सभा बोलावून गटाचे नगरपालिकेतील गटनेते राजेश गायकवाड यांना पाय उतार करीत नगरसेवक बबलू कांबळे यांची निवड केली आहे, सदरची निवड ही पूर्णपणे बेकायदेशीर असून जिल्हाधिकारी यांच्याकडे नगराध्यक्षांसह 10 अपक्ष नगरसेवकांचा गटनेता म्हणून माझी नोंद असून ही नोंद रद्द झाल्या शिवाय अशी कोणाचीही गटनेतेपदी निवड करता येत नाही असा दावा गटनेते पदावरून पाय उतार करण्यात आलेले राजेश गायकवाड यांनी केला आहे.
सदरच्या प्रक्रियेबाबत गायकवाड यांनी पत्रक प्रसिद्ध करीत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर(2017) निवडून आलेल्या अपक्ष नगराध्यक्षा व आम्ही 10 अपक्ष नगरसेवक यांना निवडणूक आयोगाने वितरित केलेल्या नगरसेवक पदाच्या प्रमाण पत्रामध्ये आमच्या 11 जणांची नोंद नागरिक हित संरक्षण मंडळ म्हणून करण्यात आली आहे. त्यानंतर हा गट स्थापन केल्यानंतर रीतसर आम्ही नगराध्यक्षांसह 10 नगरसेवक असे एकूण 11 जणांची बैठक बोलावून भविष्यात नगरपालिकेचे कामकाज या गटामार्फत करायचे असा निर्णय घेऊन सर्वानुमते माझी गटाचा गटनेता म्हणून व बबलू कांबळे यांची उपगट नेते पदी पक्षांतर बंदी कायदा 1986 अन्वय निवड करण्यात आली, व तशी नोंद जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांनी माझ्या गटनेते पदाला सन 2017-2022 या कालखंडासाठी मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने मागील चार ते साडेचार वर्षापासून मी सर्वांना विचारात घेऊन आज पर्यंत नगरपालिकेतील कामकाज करत आलो आहे. परंतु स्वीकृत नगरसेवक प्रेमसुख कटारिया हे संपूर्ण गटावर वेळोवेळी नियंत्रण मिळवुन माझ्या कामकाजात हस्तक्षेप करू लागले.
त्यांच्या काही निर्णयामुळे गटाच्या सदस्यांची मानहानी होऊ लागली त्यामुळे मी गटाच्या ठरलेल्या ध्येय धोरणानुसार कामकाज करू लागलो. त्यामुळे हा राग मनात धरून कटारिया यांनी उप गटनेते बबलू कांबळे यांच्या मार्फत मला गटा विरुद्ध कामकाज करत आहात म्हणून बेकायदेशीररित्या खुलाशाची नोटीस काढली.
वास्तविक पाहता कायद्याने उप गटनेत्या ला कोणतेच अधिकार नसताना त्यांनी नोटीस काढली आहे. दि.6 सप्टेंबर च्या बैठकीमध्ये विषय पत्रिकेवर नसलेला विषय घेऊन कांबळे यांनी स्वतःची गटनेतेपदी निवड केलेली स्वयंघोषित घोषणा ही बेकायदेशीर असून गैरलागू आहे असेही राजेश गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद केले आहे.