|सहकारनामा|
दौंड : नगराध्यक्षा शितल कटारिया स्थायी, सर्वसाधारण सभा बोलवीत नाहीत त्यामुळे शहरातील विकास कामे रखडली आहेत असा आरोप करीत नगरपालिकेतील राष्ट्रवादी मित्रपक्षांचे गटनेते बादशहा शेख व सत्ताधारी गटाचे गटनेते राजेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली, नगराध्यक्ष यांच्या कारभाराविरोधात नगरपालिकेतील कामकाज बेमुदत बंद आंदोलन दि.6 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे आंदोलन नौटंकी असून, नगरपालिकेतील कामकाज बंद राहिल्याने सामान्य नागरिक वेठीस धरला जात आहे. म्हणून दिनांक 9 ऑगस्ट पासून न. पा. तील कामकाज सुरू करण्यासाठी ऑल इंडिया पॅंथर सेना आंदोलन करणार आहे असे निवेदन प्रशासनाला प्राप्त झाल्याने, शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीमध्ये येथील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी या उद्देशाने आंदोलन कर्त्या दोन्ही गटामध्ये समेट घडवून आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला. दोन्ही गटाच्या प्रमुखांची व नगरसेवकांची बैठक बोलविण्यात आली. यावेळी तहसीलदार संजय पाटील, दौंडचे पोलीस उप. अधीक्षक राहुल धस, पो. निरीक्षक नारायण पवार तसेच नगराध्यक्ष शितल कटारिया, राष्ट्रवादीचे गटनेते बादशहा शेख, सत्ताधारी गटाचे गटनेते राजेश गायकवाड व दोन्ही गटाचे नगरसेवक उपस्थित होते.
बैठकीमध्ये, नगराध्यक्ष जोपर्यंत सभा बोलवीत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीकडून मांडण्यात आली तर दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा पर्यंत सभेचा अजेंडा देणार आहे असे आश्वासन कटारिया गटाच्या नगराध्यक्षा शितल कटारिया यांनी बैठकीत दिले असल्याचे दौंडचे पोलीस उप. अधीक्षक राहुल धस यांनी सांगितले आहे.
बैठकीत झालेल्या चर्चे बाबत पत्रकारांना माहिती देताना राहुल धस म्हणाले, नगरपालिकेतल्या ज्या मुद्द्यांवर हा विषय चालू आहे, या मुद्द्यांवर एकमत कसे होईल, तांत्रिक व प्रशासकीय बाबीं बाबत चर्चा झाली आहे, या बाबींची पूर्तता होण्यासाठी आवश्यक असणारा पत्रव्यवहार चालू झालेला आहे. त्या पत्रव्यवहाराच्या अंती जो निर्णय होईल त्याप्रमाणे पुढे जाण्याचे दोन्ही गटाने मान्य केले आहे. दोन्ही गटांना शांतता राखण्याचे आवाहनही केले असल्याचे धस यांनी सांगितले.
नगरपालिकेत आजपासूनच पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील. शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडली जाणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाणार आहे. भावना भडकविल्या जातील अशी निवेदने काढणाऱ्यांना पोलीस प्रशासन नोटिसा देणार आहे असे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.