दौंड : शहर प्रतिनिधी
दौंड शहरामध्ये जर बिअर बार सुरू करावयाचा असेल तर त्या कामाला कोणी विरोध करीत नाही, परंतु नवीन लोकवस्तीत होत असलेल्या स्मशान भूमी कामाला मात्र काही विघ्नसंतोषी लोक विरोध करतात व त्यांच्या विरोधाला येथील राजकीय पुढारी अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवितात, व नगरपालिका ही लागलीच ते काम थांबवते हे या शहराचे दुर्दैव आहे. असे वक्तव्य नगरसेवक जीवराज पवार यांनी केले.
मी कटारिया गटाकडून नगरसेवक झालो आहे मात्र माझ्याच गटाच्या नगराध्यक्षा माझ्या कामांना विरोध करीत असल्याचे दिसत असल्याने मी राष्ट्रवादीच्या गटात आलो आहे असेही पवार म्हणाले. नगराध्यक्षांच्या मनमानी कारभारा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्ष्यांच्या नगरसेवकांनी नगरपालिकेत आंदोलन सुरू केले आहे, आंदोलन आणखीन तीव्र करण्या संदर्भात माहिती देण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक इंद्रजीत जगदाळे यांनी पत्रकार परिषद बोलाविली होती, त्यावेळी जीवराज पवार बोलत होते. यावेळी नगरसेवक वसीम शेख, राजेश गायकवाड, संजय चीतारे, शिवसेनेचे शहराध्यक्ष आनंद पळसे, आबा वाघमारे, प्रशांत धनवे, अजय राऊत आदि उपस्थित होते.
जीवराज पवार पुढे म्हणाले, माझ्या प्रभागामध्ये नगरपालिकेचे आरक्षण असलेल्या जागेमध्ये स्मशान भूमी चे काम व्हावे म्हणून मी सातत्याने पाठपुरावा केला. नगरपालिकेच्या सभेमध्ये सर्व नगरसेवकांनी या कामाला एकमताने मंजुरी दिली, प्रशासकीय मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तीही मिळाली. म्हणून मी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वीरधवल जगदाळे व बादशहा शेख यांना या कामासाठी निधी द्यावा अशी मागणी केली, त्यांनी पालक मंत्री अजित पवार यांच्याकडे सदर कामासाठी निधीची मागणी केली आणि अजित दादांनी जवळपास दोन कोटी रुपये या कामासाठी दिले. या कामाचे श्रेय अजित पवार यांना मिळू नये व मी राष्ट्रवादीच्या संपर्कात गेल्याने कटारिया यांनी या कामात आडकाठी आणण्याचे काम सुरू केले. कोणालातरी पुढे करून केवळ सूडबुद्धीने या कामाच्या विरोधात तक्रार करावयास लावून काम थांबविण्याचे षडयंत्र यांनीच केले आहे असे जीवराज पवार यावेळी म्हणाले.
नगराध्यक्षांच्या मनमानी कारभारा विरोधात बोलताना इंद्रजीत जगदाळे व वसीम शेख म्हणाले की, नगरपालिकेच्या इतिहासात आज पर्यंत कोणत्याच नगराध्यक्षांनी सभेचा असा अजेंडा यापूर्वी काढला नसेल तसा अजेंडा विद्यमान नगराध्यक्षांनी काढला आहे. शहर विकासाची जी कामे राष्ट्रवादी च्या नगरसेवकांना अपेक्षित आहेत, जी कामे अजेंडा मध्ये घेतली जावीत अशी मागणी या नगरसेवकांनी करूनही नगराध्यक्षांनी ही कामे त्यामध्ये घेतलेली नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांचा अजेंडा नामंजूर करून त्यांच्या मनमानी कारभारा विरोधातील आंदोलन सुरूच ठेवले आहे व पुढे ते आणखीन तीव्र स्वरूपात करणार आहोत. या सर्व कामांना सर्वसाधारण सभेत याआधीच मंजुरी घेतलेली आहे, त्याबाबतची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या कामांसाठी चे टेंडर आलेले आहेत, त्यामुळे स्थायी समिती समोर ते येणे गरजेचे आहे मात्र नगराध्यक्ष सभाच बोलवायला तयार नाही. ज्यामुळे शहरातील जवळपास 20 कोटींची कामे रखडली आहेत.
वसीम शेख यांनी नगराध्यक्ष यांच्यावर आरोप करताना असे सांगितले की या 7-8 या प्रभागांमधील चार नगरसेवकांपैकी दोन नगरसेवक मागासवर्गीयांसाठी राखीव प्रभागातून निवडून आलेले आहेत, मग या प्रभागात मागासवर्गीय समाज नाही हा नगराध्यक्षांचा आरोप बिनबुडाचा व फक्त राजकीय सूडबुद्धीने केला जातो आहे. याउलट नगराध्यक्षांनी दलित निधी मिळावा यासाठी जर योग्य पाठपुरावा केला तर शहरासाठी आणखीन 7-8 कोटी रुपये प्रशासनाकडून प्राप्त होऊ शकतात मात्र कटारिया यांना ते करायचे नाही.
प्रभाग क्रमांक तीन मधून दोन पैकी एकही नगरसेवक मागासवर्गीय राखीव प्रभागातून निवडून आलेला नसतानाही या प्रभागात मात्र दलित वस्ती निधी मधून रस्त्याच्या काँक्रिटीकरणा चे काम घेतले गेले आहे आणि खऱ्या दलित वस्तीमध्ये तो निधी खर्चाला विरोध केला जातो आहे अशी माहितीही वसीम शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. जोपर्यंत नगराध्यक्ष आमचे सर्व विषय घेत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन बेमुदत चालूच राहणार असल्याचा पुनरुच्चार सुद्धा त्यांनी केला.