दौंड : दौंड नगरपालिकेस सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन व सॅनिटरी नॅपकिन ची विल्हेवाट लावणे करिता इनसिनेरेटर मशीन पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने (साक्षी हेल्थ केअर इंटरप्राईजेस, बारामती) खोटी कागदपत्रे तयार करून नगरपालिकेची 2 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केलेली आहे, त्यामुळे पालिकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका ज्योती वाघमारे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. मागणी करून अनेक महिने झाले मात्र पालिका प्रशासनाने याप्रकरणी ठेकेदारावर अद्याप कोणतीच कारवाई न केल्याने पालिकेच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जात आहे.24/2/2020 रोजीच्या स्थायी समिती सभेमध्ये सदर ठेकेदाराची निवेदा मंजूर करण्यात आली असून,4/3/2020 रोजी ठेकेदाराला मुख्याधिकारी यांनी पुरवठा आदेश(8 नग) दिलेला आहे.
ज्योती वाघमारे यांनी याप्रकरणी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात (18/2/2021) असे नमूद केले होते की, नगरपालिकेच्या अटी व शर्तीला अधीन राहुन या ठेकेदाराची निविदा मंजूर झालेली आहे. त्याप्रमाणे ठेकेदाराने ISO मार्क असलेल्या मशीन पुरविण्याची हमी दिलेली होती. मात्र ठेकेदाराने पुरवठा केलेल्या सदरच्या मशीन ISO मानांकित नसल्याचे आढळून येत आहे. एकंदरीत मशीन दुय्यम प्रतीच्या असल्याने त्यास महाराष्ट्र शासनाची मंजुरी नसल्याने, तसेच ISO मार्क नसल्याने ठेकेदाराने नगरपालिकेची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचे दिसते आहे. सदरच्या मशीन पालिकेच्या गोडाऊन मध्ये धूळखात पडून आहेत, त्याचा वापर पालिका करू शकत नाही, मात्र ठेकेदाराला त्याचे 2 लाख 80 हजार रु. प्रशासनाने अदा केलेले आहेत.
3जून 2020 रोजी तत्कालीन उप- नगराध्यक्ष, वसीम शेख यांनी सुद्धा मुख्याधिकारी यांना याच मशीन पुरवठा करणाऱ्या ठेक्याची माहिती मिळणेबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर 17 डिसेंबर 2020 रोजी नगरसेविका वाघमारे यांनी पुन्हा मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे याच ठेकेदाराच्या माहितीची मागणी केलेली होती. आजतागायत पालिका प्रशासनाने यांना या ठेकेदाराची व ठेक्या बाबत केलेल्या तक्रारी वरील कारवाईची काहीच माहिती दिलेली नाही. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेने वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासन या ठेकेदारा विरोधात का कारवाई करीत नाही याचे गुढ कायम राहत आहे.
नगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी पक्षाला वारंवार घरचा आहेर मिळतो आहे. या आधी सुद्धा पक्षाच्या शहराध्यक्षाने शहरातील घाणीच्या साम्राज्याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ताशेरे ओढले होते.