दौंड : राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युतीचे नगरसेवक संजय चीतारे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असल्याचे पीठासीन अधिकारी, नगराध्यक्ष शितल कटारिया यांनी घोषित केले. तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी संजय पाटील तसेच राष्ट्रवादी, शिवसेना यूतीचे व नागरिक हीत संरक्षण मंडळाचे नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
आज दि.2 डिसेंबर रोजी नगरपालिकेच्या सभाग्रहात उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या पदासाठी फक्त राष्ट्रवादी -शिवसेना युतीचे संजय चितारे यांचाच उमेदवारी अर्ज दाखल असल्याने चितारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. दौंड नगरपालिकेत 24 पैकी 14 नगरसेवक युतीचे असल्याने त्यांच्याकडे बहुमत आहे तर नगराध्यक्ष सह 10 नगरसेवक नागरिक हीत संरक्षण मंडळाचे आहेत. पालिकेत बहुमत असल्याने युतीने पाच वर्षात, शिवसेनेच्या हेमलता परदेशी तसेच राष्ट्रवादीचे राजेश जाधव, वसीम शेख, विलास शितोळे व आता संजय चितारे यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली आहे. चितारे हे प्रभाग क्रमांक 1 मधून मागासवर्गीयांसाठी राखीव प्रभागातून निवडून आलेले आहेत.
राष्ट्रवादी -शिवसेना युतीने सामाजिक भान ठेवीत नगरपालिकेत सर्वच समाजाला नेतृत्वाची संधी देऊन सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. रिक्षा चालक असलेले नगरसेवक संजय चितारे यांना संधी देऊन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे असा संदेश आम्ही दिला आहे असे पक्षाचे नगरपालिकेतील गटनेते बादशहा शेख यांनी यावेळी सांगितले.