हाणामारीत एकाचा खून, 4 आरोपींना न्यायालयाकडून 6 वर्षांची सजा

दौंड : मौजे खामगाव ता. दौंड जि.पुणे येथील सन २०११ मध्ये झालेल्या खुनातील आरोपींविरुद्ध सबळ पुरावा मिळाल्याने सेशन कोर्ट, बारामती यांनी ६ वर्षे सश्रम कारावास व १०,००० रु दंड व दंड न भरल्यास २ महिने साधी कैदीची शिक्षा सुनावण्यात आल्याचे यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.
दि.२३/०३/२०११ रोजी सौ. मनीषा महेंद्र नागवडे (रा. खामगाव ता.दौंड जि.पुणे) यांनी फिर्याद दिली होती. दि. २२/०३/२०११रोजी साय ०७.:३० वा चे सुमा फिर्यादी व त्यांचा मुलगा आकाश, भावाचा मुलगा अक्षय, बहिणीचा मुलगा श्रीनाथ असे घरासमोर असलेल्या गेटजवळ गप्पा मारत बसलेले असताना सगळी मुले नदीवर पोहण्यास गेल्यावर त्यांचे कडून सतीश नागवडे याच्या अंगावर पाणी उडाल्याचे कारणावरून आरोपी १) राजेंद्र भगवान मोडक २) जालिंदर उर्फ अण्णा बाळासाहेब येळवंडे ३) सतीश विष्णू नागवडे ४) विजय सावळा तांबे ५) अविनाश रमण शेळके ६) बाळासाहेब बबन ढमाळ ७) दिलीप रंगनाथ सावंत (सर्व रा.खामगाव ता. दौंड जि.पुणे) यांनी पोहताना पाणी उडालेचे कारणावरून बहिणीचा मुलगा श्रीनाथ विजय लेंडगे यांस व इतर सर्वाना वरील आरोपींनी हातातील काठीने, हाताने व लाथाबुक्क्याने जबर मारहाण केली होती. सदर मारहाणीत श्रीनाथ लेंडगे यांस जबर मार लागल्याने त्यांस उपचार कामी रुबी हॉल हॉस्पिटल येथे ऍडमिट केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

या बाबत यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कोर्टात केस चालून यातील आरोपी क्र. १ ते ४ यांना मे सेशन कोर्ट शेख साहेब यांनी आरोपींविरुद्ध सबळ पुरावा मिळाल्याने सदर गुन्ह्यामध्ये दोषी धरून ६ वर्षे सश्रम कारावास व १०,००० रु.दंड व दंड न भरल्यास २ महिने साधी कैदेची शिक्षा व जबर मारहाणीमध्ये २ वर्ष सश्रम कारावास व ५०००/- रु दंड व दंड न भरल्यास २ महिने साधी कैदेची शिक्षा व मारहाणीमध्ये १ महिना सश्रम कारावास व १०००/- रु दंड व दंड न भरल्यास १५ दिवसाच्या साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. तर आरोपी क्र. ५ ते ७ यांचे विरुद्ध सबळ पुरावा नसल्याने मे सेशन कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, सध्याचे केस अधिकारी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केला असून, सहा फौज नलावडे, पोलीस नाईक विजय ढोपरे, सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी त्यांना केस कामी मदत केली आहे.