अख्तर काझी
दौंड : नगर विकास विभाग, नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांचे मार्फत पुणे विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन बारामती या ठिकाणी दिनांक 11 व 12 फेब्रुवारी 2025, दोन दिवस घेण्यात आल्या. पुणे विभागीय स्पर्धांमध्ये दौंड नगर परिषदेला एकूण चार बक्षिसे मिळाली आहेत.
विभाग स्तरावर कॅरम स्पर्धा महिला गटात तंजुम बागवान यांनी विजेतेपद मिळविले, बुद्धिबळ स्पर्धेत महिला गटात मनाली जामदार यांनी द्वितीय क्रमांक, वैयक्तिक गायन स्पर्धेत विठ्ठल सोनवणे यांचा द्वितीय क्रमांक तसेच समूह वेशभूषा स्पर्धेत दौंड नगर परिषदेने तृतीय क्रमांक पटकावला आहे. दौंड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड नगरपरिषदेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवलेला होता.
या स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रथम क्रमांकाचे स्पर्धकांना विभागीय स्तरावर प्रवेश देण्यात आलेला होता. विभाग स्तरावर वरील प्रमाणे विजेते ठरलेल्यांना राज्यस्तरावर आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी संधी देण्यात येणार आहे.
मा. आयुक्त तथा संचालक मनोज रानडे , विभागीय सह आयुक्त पुनम मेहता, उपायुक्त दत्तात्रय लांघी, जिल्हा प्रशासन अधिकारी व्यंकटेश दुर्वास, बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आणि इतर पाच जिल्ह्यांचे जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला.