दौंड : अख्तर काझी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नराधम वाल्मीक कराड व त्याच्या टोळीने अत्यंत निर्दयीपणे हत्या केली, या टोळीचे राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी थेट संबंध असल्याचे उघड झाल्याने संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनाही सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी करत सकल मराठा समाजाच्या वतीने दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन करण्यात आले.
शहरातील सर्व राजकीय पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभागी होत मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी मराठा समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की मस्साजोग येथील स्व. सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर व निर्दयी पणे हत्याकरणाऱ्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहीजे तसेच स्व. सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण खुनातील आरोपीना पाठीशी घालणाऱ्या धनंजय मुंडे व इतर सर्वांना सह आरोपी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे.
या पत्रामध्ये पुढे, सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही व्हावी व त्यांच्या कुंटुबियांना न्याय मिळावा, आपल्या दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरुन अवमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर व प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्याना कठोर शिक्षा व्हावी, औरंगजेबावर स्तुर्तीसुमने उधळनाऱ्या अबु आजमी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
वरील घटनांचे समाजामध्ये खुप तीव्र प्रतिक्रीया आहेत त्यामुळे शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन योग्य तो न्याय द्यावा अशीही मागणी दौंड शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.