अख्तर काझी
दौंड : शहरातील आठ वर्ष रखडलेली बहूचर्चित तिसरी कुरकुंभ मोरी पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागली आहे. या मोरीचे( भुयारी मार्ग) काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे मात्र या मोरी ला आवश्यक असणाऱ्या रस्त्याचे नियोजनच नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे या मोरीचा रस्ता शेजारी असलेल्या जुन्याच रस्त्याला जोडले जाणार व त्यामुळे या परिसरात आणखीनच वाहतूक कोंडी, छोटे मोठे अपघात होणार असा संभाव्य धोका ओळखून येथील न्यू महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा विकास दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नागसेन धेंडे यांनी सध्या सुरू असलेल्या रस्ता कामाला आक्षेप घेतला आहे.
या मोरी साठी सरळ रेषेत नवीन रस्ता व्हावा व या कामात अडथळा ठरणारी शासनाने भाडेतत्त्वावर दिलेली दुकाने काढण्यात येऊनच रस्ता करावा अशी मागणी धेंडे यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे. जर सदरचा रस्ता सरळ रेषेत न करता तो धोकादायक वळण घेत पूर्वीच्याच रस्त्याला जोडला जाणार असेल तर मात्र संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागसेन धेंडे यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दौंड नगरपालिकेच्या हद्दीतील हुतात्मा चौक येथील सर्वे नं.1577 मधील शासनाने भाडेतत्त्वावर दिलेली दुकाने तिसऱ्या कुरकुंभ मोरीतून नव्याने तयार होत असलेल्या रस्ता कामाच्या मार्गात येत आहेत. तसेच टाऊन प्लॅनिंग नुसार सदरचा रस्ता सरळ रेषेत असून,व भाडेतत्त्वावर दिलेल्या दुकानांची मुदत संपलेली असताना देखील कुटील हेतूने सदरची दुकाने वाचवून सदर रस्त्याला धोकादायक वळण देऊन रस्ता तयार करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार व रहदारीनुसार शहरासाठी अत्यंत घातक असल्याने यावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. कुरकुंभ मोरी परिसरात गेल्या अनेक वर्षापासून शासकीय जागेत भाडेतत्त्वावरील ही दुकाने उभी आहेत, जी रस्त्याला अडथळा ठरत आहेत.
शहरातील वाढती लोकसंख्या व वाढती वाहतूक यामुळे पूर्वीचा रस्ता अपुरा पडत आहे. अपुऱ्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. असे असताना दौंड नगरपालिका व संबंधित विभाग सदर दुकानांना वाचविण्यासाठी तिसऱ्या मोरीच्या सरळ रेषेत असणाऱ्या रस्त्याला वळण देऊन मुख्य रस्त्याला जोडण्याच्या तयारीत आहेत. सदर रस्त्याला अडथळा ठरणारी ही दुकाने त्वरित हटविण्यात यावीत याबाबत मा. उपविभागीय अधिकारी( दौंड- पुरंदर उपविभाग, सासवड) सार्वजनिक बांधकाम विभाग दौंड, दौंड पोलीस स्टेशन तसेच रेल्वे व्यवस्थापक सोलापूर विभाग आदींना निवेदन देण्यात आलेले आहे. सदरचा रस्ता अडथळा ठरणारी दुकाने काढूनच करण्यात यावा अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा नागसेन धेंडे यांनी निवेदनातून दिला आहे.