|सहकारनामा|
दौंड शहर : प्रतिनिधी (अख्तर काझी)
तिसऱ्या कुरकुंभ मोरी (भुयारी मार्ग) कामासाठी लागणारे दोन बॉक्सचे काम ठेकेदाराकडून पूर्ण होऊन दीड वर्ष झाले आहे.
परंतु या बॉक्स पुशिंग कामामध्ये मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे ज्यामुळे रेल्वे प्रशासन बॉक्स पुशिंगसाठी परवानगी देत नाही, त्यामुळे आता हे काम केव्हा सुरू होईल हे सांगता येत नाही अशी चर्चा शहरभर होत आहे. मात्र बॉक्स पुशिंगच्या कामामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण झालेली नाही.
आम्ही फक्त पावसामुळे थांबलो आहोत व सदरचे काम लवकरच (25 ऑक्टोबर) सुरू करीत आहोत असा खुलासा रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता सुरेंद्र कुमार यांनी केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे या कुरकुंभ मोरी कामाचा आढावा घेण्यासाठी दौंड मध्ये आल्या होत्या त्यावेळी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या कामा बाबतची माहिती दिली. त्यामुळे आता लवकरच बहुचर्चित तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे अशी आशा दौंडकर नागरिकांनी करण्यास हरकत नाही.
यावेळी मा. आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ता. अध्यक्ष आप्पासो पवार, शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक बादशहा शेख, रेल्वेचे ठेकेदार राजेंद्र उगले तसेच पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
सदर मोरीचे काम मागील सात वर्षापासून काहीना काही कारणामुळे रेंगाळतच चालले आहे. त्यामुळे आता खुद्द खा.सुप्रिया सुळेच हे काम पूर्ण करण्यासाठी लक्ष देत आहेत. व वेळोवेळी दौंडला येऊन कामाची पाहणी करीत आहेत. दि.14 सप्टेंबर रोजी सुद्धा सुळे यांनी सदर कामाची पाहणी करीत पुढील कामांबाबत संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली व काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या, तसेच दि. 2 नोव्हेंबर रोजी दौंडला पुन्हा येऊन कामाची प्रगती कुठपर्यंत झाली आहे याची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
खा. सुळे यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाला ही भेट दिली, व या ठिकाणी नव्याने होत असलेल्या 100 खाटांच्या दवाखाना इमारतीच्या कामाची व ऑक्सिजन प्लांट कामाची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबतची माहिती घेतली. दवाखाना इमारतीच्या भूमीपूजनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची वेळ घेऊन भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.