दौंड : दौंड शहराला कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न येथील सामान्य नागरिकांना पडला आहे. आणि तशी परिस्थिती सुद्धा पाहायला मिळत आहे.
तब्बल आठ वर्ष काम रेंगाळलेल्या शहरातील तिसऱ्या कुरकुंभमोरीसाठी आजही स्वतंत्र रस्त्याचे नियोजन नाही, संपूर्ण शहरामध्ये महिलांसाठी एकही शौचालय नाही, शहरातील गोल राऊंड चौकात एसटी ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बस स्थानक उभारले आहे ज्या ठिकाणाहून असंख्य महिला प्रवासी प्रवास करीत असतात, या ठिकाणी महिलांसाठी शौचालय नाही, नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली प्रभागातील कामे अर्धवट अवस्थेत पडलेली आहेत असे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना या शहरातील राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, मा. नगरसेवक, पुढारी सारेच मूग गिळून गप्प का बसले आहेत असा प्रश्न येथील सामान्य नागरिकांना सतावतो आहे.
आपल्या समस्यांबाबत नगरपालिकेकडे तक्रार करण्यासाठी जर कोणी सामान्य नागरिक गेला तर त्याची दखल घेतली जात नाही अशी परिस्थिती आहे. मागील काही दिवस शहरात मुसळधार पाऊस पडतो आहे, मोठ्या पावसामुळे झोपडपट्टी प्रभागातील गटारींची दुर्दशा झाली आहे. काही प्रभागातील गटारे फुटून घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. असाच एक प्रकार मोठी वर्दळ,वाहतूक असलेल्या शालिमार चौक परिसरात दिसून येत आहे. येथील सराफ दुकानासमोरील रस्त्यालगत असणारे गटार पूर्णपणे फुटले असून त्याच्यातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे.
आजूबाजूच्या व्यापाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे, या घाण पाण्यातूनच ग्राहकांना दुकानात जावे लागत आहे. मागील आठ दिवस झाले या ठिकाणी अशीच जैसे थे परिस्थिती आहे. परिसरातील सामान्य नागरिक व या रस्त्याने ये जा करणारे नागरिक निमूट पणे हा सर्व प्रकार सहन करीत आहेत. नगरपालिकेला मात्र नागरिकांच्या या समस्येकडे पहायला वेळ नाही. परिसरातील काहींनी नगरपालिकेत जाऊन या परिस्थितीबाबत तक्रारी केल्या आहेत याचाही काही उपयोग झालेला नाही. या परिसरातील मतदारांना मतांचा जोगवा मागणाऱ्या पुढार्यांच्या डोळ्यांना हे चित्र दिसत नाही का? तुमच्याच मतदारांची दुकाने ,घरे येथे आहेत हे तुम्ही सध्या विसरला आहात का? असा प्रश्न आता येथील नागरिक उपस्थित करीत आहेत.