दौंड : शहरातील अष्टविनायक मार्गावरील संत मदर तेरेसा चौकात (नगर मोरी) तृतीयपंथीय टोळी वाहन चालकांकडून अक्षरशा खंडणी वसूल केल्याप्रमाणे पैसे गोळा करीत आहे.
तृतीयपंथीय मुख्य चौकात रस्त्याच्या मधोमध थांबून येणारे – जाणारे प्रत्येक वाहन अडवून दादागिरी करीत पैसे उकळत आहेत. यांना पैसे नाकारणाऱ्या वाहनचालकांना अश्लील हावभाव करून व शिवीगाळ करीत पैसे घेतले जात असल्याचेही स्थानिक सांगत आहेत.
असला घाणेरडा प्रकार दौंडमध्ये याआधी कधीच पाहण्यात येत नव्हता. परंतु सध्या रोजची ड्युटी असल्याप्रमाणे हे टोळके चौकात येऊन वाहनचालकांना लुबाडण्याचे काम नित्य नेमाने करीत आहे. हा सर्व अश्लील प्रकार भर दिवसा व पोलिसांसमोर होत असताना कोणीच या टोळीला मज्जाव करताना दिसत नाही. त्यामुळे निर्ढावलेले हे टोळके बिनधास्तपणे कोणालाही न घाबरता हप्ता वसुली करताना दिसत आहे. पोलिसांना या सर्व प्रकाराबाबत तक्रार करूनही पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई या ठिकाणी झालेली दिसत नाही. आजही सकाळपासून तृतीयपंथीय वाहनचालकांकडून पैसे लुटताना दिसतच आहेत. या मार्गावरून जाणारा प्रत्येक वाहन चालक या प्रकाराला वैतागला आहे व तितकाच हतबल सुद्धा आहे.
दौंड पोलिसांसमोरच हा सर्व किळसवाणा प्रकार सुरू असून सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर आता यांची तक्रार नेमकी कोणाकडे करावयाची असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हा सर्व प्रकार चालू असताना या चौकातून जाणाऱ्या महिला शरमेने मान खाली घालून जाताना दिसतात. त्यामुळे,अरे कोणीतरी आवरा यांना अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.