दौंड | स्वातंत्र्य सैनिक कै.पाटसकरांच्या घरासाठी 23 ऑगस्टला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पोकळ बांबू मोर्चा

दौंड : स्वातंत्र्य सैनिक, दौंडचे मा. आमदार कै.जगन्नाथ पाटसकर(ज. ता.) यांना राज्य शासनाकडून घर बांधून मिळणार होते. मात्र गेली 31 वर्ष पाटसकर यांच्या घराचा प्रश्न प्रलंबितच आहे. त्यामुळे पाटसकर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आता अखिल भारतीय मराठा महासंघाने यल्गार पुकारला आहे. राज्य शासनाच्या पोकळ आश्वासना विरोधात मराठा महासंघ 23 ऑगस्ट रोजी दौंड मध्ये पोकळ बांबू मोर्चा आंदोलन करणार आहे.

मराठा महासंघाच्या वतीने दौंड पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, दौंड तालुक्याचे मा.आमदार, स्वातंत्र्य सैनिक ज .ता .पाटसकर यांनी दौंडच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून 1992 साली आपल्या स्वमालकीची साडेसात एकर जमीन येथील एसटी डेपो व उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र शासनास दिली. त्या बदल्यात पाटसकरांना शासनाकडून घरासाठी जागा व घर बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु 31 वर्षानंतरही शासनाकडून या प्रकरणामध्ये दिरंगाईच होताना दिसत आहे. आजही ज.ता.पाटसकर यांचे कुटुंबीय (तिसरी पिढी) भाड्याच्या घरामध्येच राहत आहेत.

त्यामुळे पाटसकर कुटुंबीयांना आता तरी योग्य तो न्याय मिळावा व महसूल विभाग व महाराष्ट्र शासन यांचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दि. 23 ऑगस्ट रोजी दौंड तहसीलवर पोकळबांबू मोर्चा आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.