Daund | सावित्रीबाई फुले महिला गृह उद्योग संस्थेच्या वतीने महिलांना कलाकुसरीचे प्रशिक्षण

दौंड : दौंड येथील सावित्रीबाई फुले महिला गृह उद्योग संस्थेच्या वतीने विविध प्रकारच्या कलाकसुरींचे प्रशिक्षण येथील महिलांना देण्यात आले. यावेळी विविध कलाकुसरींचे प्रात्यक्षिक या महिलांना दाखविण्यात आले.

या संस्थेकडून अश्या प्रकारच्या विविध प्रशिक्षणाचे कार्यक्रम वेळोवेळी स्वखर्चाने आयोजित केले जातात. या उपक्रमामुळे या भागातील बऱ्याच महिलांना गृह उद्योग प्राप्त झाला असून कोणाकडेही पैशांसाठी हात न पसरता त्या प्रत्येक दिवशी आपल्या गरजेपुरते पैसे मेहनतीने कमवीत असल्याने महिला भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. या सामाजिक उपक्रमामुळे संस्थेमध्ये महिलांची सदस्य संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

या कार्यक्रमावेळी सर्व उपस्थित महिला सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाची ‛कौशल्य विकास कार्यशाळा’ आपल्या दौंड विभागात सुरु करून त्याद्वारे महिला, तरुण मुलांना व्यवसायारूप करावे अशी मागणी यावेळी प्रशासनाला करण्यात आली. महाराष्ट्र शासनाचा कौशल्य विकास कार्यशाळा हा उपक्रम अनेक जिल्ह्यात राबविण्यात येतो. मात्र तो दौंड शहरात राबविला जात नसल्याने महिलांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.

तसेच शासनाकडे येथे केंद्र उपलब्ध नसेल, तर कार्यरत नसलेले, बंद पडलेले एखादे केंद्र आपल्या संस्थेला देण्यास शासनाला विनंती करावी अशी मागणी वजा विनंती या महिलांनी संस्थेच्या अध्यक्षा बगाडे ताई आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या रोटरी क्लब अध्यक्षा सन्माननीय सविताताई भोर यांच्या उपस्थितीत केली. या संदर्भात लवकरच दौंड मधील असंख्य महिला, संस्थेच्यावतीने महिलांच्या सह्यांचे निवेदन सन्माननीय मुख्यमंत्री यांना सादर करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.