एसटीने प्रवास करणाऱ्या महिलेचे सव्वा 2 लाखाचे सोन्याचे गंठण चोरट्याने केले लंपास तर दौंडमध्येही घडला चैन स्नॅचिंगचा दुसरा प्रकार

दौंड

आष्टी – स्वारगेट एस.टी ने प्रवास करणाऱ्या दौंडच्या महिलेचे सव्वा दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने श्रीगोंदा – दौंड दरम्यान चोरून नेल्याची घटना घडली आहे. अनिता संतोष गिरमे (रा.गोपाळवाडी, दौंड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दि.29 मे रोजी सकाळी 8:00 वा.आष्टी- स्वारगेट एसटीने आष्टीहुन दौंडला येत असताना, प्रवासादरम्यान त्यांनी आपल्या गळ्यातील सोन्याचे गंठण आपल्याजवळील बॅगेमध्ये ठेवले होते. एसटी श्रीगोंदा स्टॅंडवर त्या मुलाच्या लघू शंकेसाठी खाली उतरल्या होत्या. नंतर पुन्हा ते दोघे गाडीत बसले. सकाळी 10:30 दरम्यान त्यांनी दौंड येथील नगर मोरी चौकात उतरत घरी जाण्या आधी गंठण घालावे म्हणून त्यांनी पिशवीतील गंठण काढायचा प्रयत्न केला असता बॅगेमध्ये सोन्याचे गंठण आढळून आले नाही. गंठण चोरीला गेले आहे असे समजल्यानंतर त्यांनी घरच्यांशी विचार विनिमय करून दौंड पोलिसात तक्रार दाखल केली.

दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली.
शहरातील गोल राऊंड परिसरातही गळ्यातील सोनसाखळी चोरट्याने हिसकावून नेल्याचा प्रकार घडला. सिद्धार्थ नगर येथे राहणाऱ्या किशोर उजागरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दि.30 मे रोजी सायंकाळी 6.30 वा. दरम्यान येथील गोल राऊंड परिसरात किशोर उजागरे व त्यांच्या पत्नी मध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू होती. दरम्यान एक अज्ञात इसम दुचाकीवर आला व तुम्ही भांडण का करता म्हणून त्याने दमबाजी करीत किशोर याच्या गळ्यातील सोन्याची एक तोळा वजनाची (49 हजार,500 रु.) चैन हिसकावून चोरून नेली. अज्ञात साखळी चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.