Daund | अखेर तिच्या ‛जिद्दीचे’ रूपांतर ‛यशात’ झालेच, MPSC परीक्षा पास करून ‛सुषमा’ बनली महसूल सहाय्यक

राहुल अवचर

देऊळगावराजे : दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथील सुषमा रामभाऊ लावर हिने नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएसी (MPSC) च्या परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. सुषमा लावर हिची रेविन्यू असिस्टंट महसूल सहाय्यक मंत्रालय पदी निवड झाली आहे.

सातत्य पूर्ण कठोर परिश्रम आणि काहीतरी बनून दाखविण्याच्या जिद्दी च्या जोरावर तिने हे यश संपादित केले आहे. सुषमाचे प्राथमिक शिक्षण देऊळगाव राजे येथिल पुणे जिल्हा परिषद शाळेत झाले असून, माध्यमिक शिक्षण देऊळगाव राजे येथिल सिध्देश्वर माध्यमिक विद्यालय येथे झाले असून, ११वी १२वी चे शिक्षण बारामती येथिल शारदानगर येथे झाले आहे, त्याच ठिकाणी तिने ‛बी सी ए’ व ‛एम ए’ ची पदवी प्राप्त केली असून काही दिवस तिने तेथील कृषी विज्ञान केंद्राच्या शेती विषयक माहिती देणाऱ्या वृत्त वाहिनीवर काम केले होते.

बारामती एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सचिव सुनंदा पवार यांच्या प्रत्येक कामात मदत करून शाळेचे काम केले, पुणे येथे भरणारी भीमथडी यात्रा यामध्ये भाग घेऊन एक विश्वासू सहकारी म्हणून काम केले, पण जीवनात काही तरी मोठं करुन दाखण्याचं आणि आई वडिलांचं नाव मोठं करण्याचं स्वप्न तिला गप्प बसून देत नव्हत, त्यामुळे तिने तब्बल सहा-सात वर्ष अथक प्रयत्न करुन हे यश संपादित केले आहे.

सुषमाचे वडील रामभाऊ लावर हे शेतकरी असून तिची आई गृहिणी आहे. या यशाबद्दल सुषमावर देऊळगावराजे आणि परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. मात्र तिने दिलेल्या ३-४ एमपीएससी च्या परीक्षांचा अंतिम निकाल येणे बाकी असून यापेक्षाही अजुन मोठे यश मिळेल असा विश्वास सुषमा ने व्यक्त केला आहे.