DAUND CRIME | दौंड’मध्ये विवाहितेचा मानसिक छळ, मारहाण.. पतीसह कुटुंबावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

अख्तर काझी

दौंड : दौंड मधील विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून मारहाण केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी पतीसह सासरच्या तीन जणांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तेजस्वी अरुण वाघमारे (वय 32,रा. मीरा सोसायटी, दौंड) यांच्या फिर्यादीवरून पती अमोल ज्ञानेश्वर मुळे, ज्ञानेश्वर अंबादास मुळे, निर्मला ज्ञानेश्वर मुळे व अजय ज्ञानेश्वर मुळे (सर्व रा. मीरा सोसायटी, दौंड) यांच्या विरोधात भा. द.वि. 498 (अ), 323, 504, 506 तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे अमोल मुळे याच्यासोबत प्रेम संबंधातून दि. 7 ऑक्टोबर 2021 रोजी आळंदी येथे लग्न झाले. लग्नानंतर दोन महिने सासरच्या लोकांनी त्यांना व्यवस्थित नांदविले. परंतु डिसेंबर 2021 मध्ये पती अमोल याचे एका महिलेची संबंध असल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. या बाबत फिर्यादी यांनी पतीस वारंवार विचारणा केल्यानंतर पतीने त्यांना उपाशी ठेवून शारीरिक व मानसिक त्रास देत मारहाण केली, त्यांना दमदाटी सुद्धा करण्यात आली. प्रेम विवाह केल्याने सदरचा प्रकार माहेरीही सांगता येत नसल्याने फिर्यादी गप्प राहिल्या. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये पती कोणाशी तरी फोनवर जास्त वेळ बोलत असल्याचे दिसल्याने त्यांना संशय आला व त्यांनी याबाबत विचारणा केली असता पतीकडून त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली.

यावेळी फिर्यादी यांना त्यांच्या सासूने जातीवाचक बोलून शिवीगाळ केली व ही प्रत्येक वेळेस केस करण्यासाठी पोलीस स्टेशनला जाते हिला घरातून हाकलून द्या असे म्हणत शिवीगाळ केली. दि. 1जून 2023 रोजी रात्री 12 वा. सुमारास फिर्यादी यांना पतीने पुन्हा मारहाण केली व घरच्यांनीही तुला राहायचे असेल तर नीट राहा म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. फिर्यादी काम करत असलेल्या कार्यालयामधील लोकांनी सदरची बाब फिर्यादी यांच्या भावाला सांगितली, फिर्यादी यांनीही घडलेला सर्व प्रकार आपल्या भावाला सांगितला व दौंड पोलीस स्टेशनला येऊन पतीसह सासरच्या लोकांविरोधात तक्रार दिली. पुढील तपास दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव करीत आहेत.