|सहकारनामा|
दौंड : शहरात ठिकठिकाणी कचरा रस्त्यावर टाकला जात आहे. व तो नगरपालिकेने न उचलल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य होत आहे, व त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे, अशा तक्रारी नगरपालिका प्रशासन, नगराध्यक्ष व नगरसेवकांकडे वारंवार होत आल्या आहेत. आता मात्र खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष गुरुमुख नारंग यांनीच शहरातील घाणीच्या समस्यांबाबत आवाज उठवीत नगरपालिकेतील स्वतःच्याच पक्षातील नगरसेवकांना घरचा आहेर दिल्याचे चित्र दिसत आहे. त्यांनी आपल्या मोबाईल मधून ज्या रस्त्यांवरील कचऱ्याचे व घाणीचे जे चित्रण करून प्रसिद्ध केले आहे त्या प्रभागांमधून राष्ट्रवादीचेच नगरसेवक निवडून आलेले आहेत. नारंग यांनी या बाबत शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे की, शहरातील ज्या -ज्या ठिकाणी रस्त्यावर कचरा, घाण दिसेल तेथील फोटो किंवा मोबाईल मध्ये चित्रण करावे व ते मोबाईल द्वारे सर्वत्र प्रसारित करावेत म्हणजे आपल्याला नगरपालिका प्रशासनाकडे दाद मागता येईल. सध्या शहरातील रस्त्यांवरचा फक्त प्लास्टिक गोळा केला जात आहे, साचलेला पूर्ण कचरा उचलला जात नाही. उघड्या कचऱ्यामुळे त्या ठिकाणी डुकरांचा व इतर प्राण्यांचा वावर वाढतो आहे ज्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दौंड नगरपालिकेतील सर्व नगरसेवक, अधिकारी व ठेकेदार शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या दुर्लक्षते मुळे शहरात सर्वत्र मच्छरांची पैदास वाढून आजार वाढत आहेत असेही नारंग यांचे म्हणणे आहे.
नगरपालिकेत कटारिया गटाचे 11 नगरसेवक आहेत तर राष्ट्रवादी शिवसेना युतीचे 16 नगरसेवक आहेत. नगराध्यक्ष पद कटारिया गटाकडे आहे. नगरपालिकेमध्ये युतीचे बहुमत असल्याने सर्व समित्या युति कडेच आहेत. त्यामुळे नारंग यांनी स्वपक्षाच्याच असलेल्या आरोग्य विभाग सभापती ला लक्ष केल्याचे चित्र समोर येत आहे. नगरपालिकेत बहुमतात असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षानीच शहरातील अस्वच्छते विरोधात आवाज उठविल्या मुळे नगरपालिका प्रशासन, नगरसेवक आतातरी नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.