दौंड रेल्वे माल धक्क्यावरील बेकायदेशीर कामगारांवर कारवाईची पीपल्स रिपब्लिकन पार्टीची मागणी, रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

अख्तर काझी

दौंड : दौंड येथील रेल्वे माल धक्क्याचा अवैध कामगारांनी कब्जा घेतल्याने येथील स्थानिक कायदेशीर असलेल्या कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अवैध असलेल्या कामगारांकडून कायदेशीर कामगारांना दंडेलशाही पद्धतीने धमकविण्यात येत आहे.

या अवैध कामगारांचे ठेकेदार सर्रासपणे शासनाचे व माथाडी संघटनेचे नियम मोडून बेकायदेशीर असलेल्या कामगारांकडून या ठिकाणी माल चढविणे- उतरविण्याचे काम करून घेत आहेत. या कामगारांची माथाडी बोर्डात नोंद नसल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन कडून दिली जात आहे.

या सर्व दंडेलशाही विरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमित सोनवणे यांनी आवाज उठविला असून या मालधक्क्यावरील अवैध कामगारांविरोधात कारवाई व्हावी अशा मागणीचे निवेदन पक्षाच्या वतीने दौंड तहसीलदारांना देण्यात आले आहे. पक्षाच्या मागणीप्रमाणे या कामगारांवर कारवाई न झाल्यास दौंड मधील संत मदर तेरेसा चौकात( नगरमोरी चौक) रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा पक्षाने निवेदनातून दिला आहे.