दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक | मतदान प्रक्रिया शांततेत पार, शहरातील मतदान केंद्रावर 99.51% मतदानाने 39 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

अख्तर काझी

दौंड : शहरातील संत तुकडोजी विद्यालयामध्ये दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठीचे मतदान शांततेत पार पडले. या मतदान केंद्रामध्ये तब्बल 99.51% मतदान झाले असून शेवटच्या झालेल्या मतदानाने येथील 39 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

आज सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी व अडते तसेच हमाल मापाडी या प्रवर्गासाठी सदरच्या केंद्रावर सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत एकूण 622 पैकी 619 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. (सोसायटी 242, ग्रामपंचायत 158, व्यापारी व अडते 186, हमाल मापाडी 33) असे बाजार समिती निवडणुकीसाठी एकूण 39 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. राहू, यवत, केडगाव, पाटस, दौंड ,खडकी या सहा केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली आहे.

आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात गटाचे सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सकाळपासूनच मतदान केंद्रावर ठाण मांडून बसले होते व मतदारांचे स्वागत करीत होते. बाजार समितीवर नेहमीच रमेश थोरात गटाचे वर्चस्व राहिले आहे, परंतु यावेळी आमदार राहुल कुल यांनी बाजार समितीची निवडणूक गांभीर्याने लढण्याचा निर्धार केल्याने यंदाच्या निकालात काहीतरी चमत्कार घडेल असा विश्वास कुल यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत. तर असा कोणताच चमत्कार घडणार नाही असे थोरात समर्थक ठामपणे सांगत आहेत. उद्या दि 29 रोजी निवडणुकीचा निकाल आहे या निकालामध्ये असा चमत्कार दिसतो की बाजार समिती थोरात गटाकडेच राहते याची उत्सुकता आहे.

दौंड चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त व दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी दाखविलेली खिलाडी वृत्ती यामुळे मतदान प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.