दौंड | घरफोडीकरून 6 वर्षे फरार असलेला आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अख्तर काझी

दौंड : घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये सहा वर्षापासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास पुणे जिल्हा ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने दौंड शहरामध्ये जेरबंद केले आहे. सचिन अनंता उर्फ अंत्या भोसले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.21 जुलै रोजी दुपारी 3 च्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सचिन घाडगे, असिफ शेख, अजित भुजबळ हे दौंड शहरामध्ये गस्त घालीत होते त्यावेळी असताना पोलीस हवालदार असिफ शेख यांना दौंड पोलीस स्टेशन अंतर्गत घरफोडी गुन्ह्यातील फरारी आरोपी सचिन उर्फ अंत्या हा दौंड रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची खबर मिळाली. या पथकाने लागलीच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने दौंड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये त्याला पकडण्यासाठी सापळा रचला.

या परिसरातील रेल्वे तिकीट खिडकी जवळ उभा असलेला फरार आरोपी सचिनच आहे याची खात्री झाल्याने पथकाने झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने तो सचिन भोसले(रा. धुमाळ वस्ती, आलेगाव ,दौंड) असल्याचे सांगितले. सचिन विरोधात दौंड पोलिसात 2017 सालीचे तीन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी त्याने एक घरफोडी आलेगाव येथे तर दोन घरफोड्या दौंड शहरात केलेल्या आहेत. तेव्हापासून तो फरारच होता. पुढील कारवाई कामी त्याला दौंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,पो. हवा. सचिन घाडगे,पो. हवा. आसिफ शेख, पो. हवा. अजित भुजबळ या पथकाने केली.