Daund : राजकीय मतभेद विसरून आ.राहुल कुल यांनी मारल्या तुषार थोरातांशी गप्पा



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अब्बास शेख)

आज दि.१ डिसेंबर रोजी पदवीधर मतदार संघाची निवडणूक असल्याने तालुक्यातील विविध गावांत दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात हे मतदान केंद्रांना भेटी देत आहेत.

मात्र आज केडगाव येथे हे दोघेजण  समोरासमोर आल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना वेगळाच अनुभव आला. तुषार थोरात दिसताच आमदार राहुल कुल यांनी त्यांची आदराने विचारपूस करून दिलखुलास गप्पागोष्टी केल्या. तसेच दोघांनी एकत्र बसून चहाचा अस्वादही घेतला.

हे चित्र पाहून उपस्थित कार्यकर्तेही भारावून गेले. आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांचे राजकीय वैर संपूर्ण तालुक्याला माहीत आहे. हे दोघेजण व्यासपीठावर उपस्थित असताना एक दुसऱ्याकडे पाहणे, नाव घेणे, एकत्र येणे हे कटाक्षाने टाळत असतात. मात्र माजी आमदार रमेश थोरात यांचे पुत्र समोर येताच आमदार राहुल कुल यांनी त्यांची आदराने विचारपूस करणे, त्यांच्यासोबत सहज गप्पा मारणे, तालुक्यातील विषयांवर चर्चा करणे आणि तुषार थोरात यांनीही त्यांच्याशी नम्रपणे बोलून दिलखुलास चर्चा करणे हे पाहून तालुक्यातील सर्वसामान्य मानूस मात्र खुश होताना दिसत आहे.

आमदार राहुल कुल आणि तुषार थोरात यांच्यातील हि धावती भेट तालुक्यातील जनतेच्या नक्कीच लक्षात राहण्याजोगी असून दोन्ही नेत्यांच्या घराण्यांमध्ये जरी राजकीय, वैचारिक मतभेद असले तरी हे दोन्ही आमदार पुत्र मात्र पाहुणचार आणि आदरातिथ्याची आपली संस्कृती विसरले नाहीत हे आवर्जून नमूद करावे लागेल.