Daund : हाथरस प्रकरणी दौंडमध्ये वाल्मिकी समाज उतरला रस्त्यावर, कॅण्डल मार्च काढून निषेध



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका मुलीवर नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिची अमानुष पणे हत्या केली असल्याचे तिच्या परिवाराने आरोप केल्यानंतर आता सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे.

मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा दौंड मधील समस्त महर्षी वाल्मिकी समाजाने निषेध नोंदविला असून समाजाच्या वतीने शहरातून कॅण्डल मार्च काढण्यात आला होता. वाल्मिकी समाजाला पाठिंबा दर्शवित येथील सर्व आंबेडकरी विचारांच्या पक्षांनी कॅण्डल मार्च मध्ये सहभाग दर्शविला. 

समाजाच्या वतीने, नराधमांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत खटला दाखल करून तो जलद गती न्यायालयात चालवावा व त्यांना जाहीर फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी दौंड पोलिसांना समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

घटनेचा तपास CBI मार्फत करण्यात यावा, मनीषा चा मृतदेह नातलगांकडे न सोपविता परस्पर अंत्यसंस्कार करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, महिलांना संरक्षण न देवु शकणारे योगी सरकार बरखास्त करावे, दलित- बौद्ध समाजावर होणारे वाढते अन्याय, अत्याचार थांबविण्यासाठी सरकारने उपाय योजना कराव्यात, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

या प्रसंगी समस्त महर्षी वाल्मिकी समाज तसेच आंबेडकरी विचार धारा मानणाऱ्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.