दौंड : दौंड शहरातून जाणाऱ्या अष्टविनायक मार्ग रस्त्याचे काम सध्या दौंड मध्ये सुरू आहे. मंजूर आराखड्याप्रमाणे शहरात काही ठिकाणी 18 मिटर तर काही ठिकाणी 11 मिटर प्रमाणे रस्त्याचे काम करावयाचे आहे. परंतु शहरातील डॉ. आंबेडकर चौक ते भीम नगर मार्गावरील रस्त्याचे काम या परिसरातील अतिक्रमणे न काढता (अरुंद) केले जात आहे. आणि याकडे दौंड नगरपालिका दुर्लक्ष करीत आहे. याविरोधात येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारले आहे. परंतु 30 सप्टेंबर 2021 अखेर पर्यंत सदरची अतिक्रमणे काढूनच या ठिकाणचा रस्ता आराखड्याप्रमाणे 11 मीटर चा करू असे प्रशासनाने लेखी पत्र दिल्याने सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. सप्टेंबर अखेर पर्यंत नगरपालिकेने या मार्गावरील कोणतेही अतिक्रमण काढलेले नाही. मात्र तरीही रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचे दिसून आल्याने आंदोलन कर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत, होत असलेल्या बेकायदेशीर कामाची माहिती दिली व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत आंदोलकांना बाहेरचा रस्ता दाखविला असल्याची माहिती आंदोलक विक्रम पवार यांनी दिली आहे.
दौंड नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व सर्व लोक प्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने आंदोलकांनी येथील गांधी चौकात मूक आंदोलन केले. जयंती निमित्ताने या ठिकाणी आलेल्या नगराध्यक्षा, नगरसेवक, नगरपालिकेतील अधिकारी यांना छोट्या मुलांच्या हस्ते गुलाबाचे फुल देत आंदोलकांनी गांधीगिरी केली.
विक्रम पवार, श्याम सोनवणे,संजय जाधव, रवी बंड, प्रकाश सोनवणे, संजय बारवकर, शिवाजी सोनोने, महेश जगदाळे, दादा जाधव, विक्रम इंगवले, गणेश काकडे, विकास जगदाळे आदी मुक आंदोलनात सहभागी होते.